नगर मनमाड महामार्गावर राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात अपघात
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
नगर मनमाड महामार्गालगत गुहा शिवारात असलेल्या शेल पेट्रोल पंपाजवळ रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान मालवाहतूक ट्रक पलटी झाल्यानंतर काही वेळातच मालवाहतूक कंटेनेरने पेट घेतल्याने कंटेनेर मधील एसी (वातानूकूलित) च्या रिकाम्या टाक्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगित कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नगर मनमाड महामार्गाने नगर वरून मालेगावच्या दिशेने जात असलेला मालवाहतूक कंटेनेर शेल पेट्रोल पंपाजवळ रात्री पलटी झाला. या मध्ये ट्रकचालक हा जखमी झाला असता त्यास राहुरी येथील खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातानंतर तब्बल चार तासाने पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे कंटेनरने अचानक पेट घेतला घेतला.तब्बल बारा तासा नंतर दुपारी 3 वा. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.कंटेनर चालकाने कंटेनेरचा दरवाजे उघडू दिले नाहीत.त्यामुळे अग्निशमन दलास आग विझवता आली नाही.अखेर चालकाचा विरोध झुगारून अग्निशमन दलाने जेसीबीच्या सहाय्याने पुढील बाजू तोडून अग्निशामक बंबाच्या साहय्याने आग विझवण्यात आली.
यावेळी सेल पेट्रोल पंपाचे बाळासाहेब लोखंडे तसेच शशि खाडे भरत गोंधळी, नितीन कोळसे, किरण कोळसे व परिसरातील नागरिकांनी विझविण्यासाठी मदतकार्य केले. आग विझविण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख गोपाल भोर, मंजाबापू बर्डे, संतोष अवसरकर, भारत साळूंखे आदी सहभागी झाले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. परंतू कंटेनेर व त्या मधील वस्तू पुर्णपणे जळून खाक झाल्या.
पावसामुळे नगर मनमाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या खड्ड्यात वाहने आदळून पलटी होऊन अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. नगर मनमाड अजून किती दिवस प्रवाशांचा बळी घेणार आहे.असा सवाल प्रवाशांनी केला आहे.