‘मोबाइल आणि नवमाध्यमांच्या या युगात नवी पिढी अध्ययन, जीवनमूल्ये व संस्कार यापासून दुरावता कामा नये. मुलांना ही शिकवण व संस्कार देण्यासाठी सर्वांगीण विकास शिबिरासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत,’ असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री, पालकमंत्री ॲड. आकाश
.

अकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप पालकमंत्री फुंडकर यांच्या उपस्थितीत झाला. श्री क्षेत्र आळंदी (देवाची) येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपशाखेचे उद्घाटनही या वेळी झाले. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान शिंदे, ज्ञानपीठ संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले, प्रकाश जवंजाळ, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्री फुंडकर म्हणाले की, पाठांतर, ओव्या, अध्याय, बालमनावर सुसंस्कार करणाऱ्या पारंपरिक अध्ययन पद्धती यांची जपवणूक संस्थेतर्फे बाल संस्कार शिबिरातून होत आहे. नवमाध्यमांच्या काळात नवी पिढीला महान परंपरा व प्राचीन वारसा, मूल्ये यांची शिकवण देण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न होत आहेत. संस्थेच्या कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासन स्तरावरून मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी पालकमंत्री फुंडकर यांनी श्री वासुदेव महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे दर्शन घेतले. संस्थेच्या भोजनगृहाचे भूमिपूजन या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. विद्यार्थ्यांनी गीतेतील श्लोकांचे सादरीकरण केले. शिबिरातील गुणवंतांना या वेळी गौरवण्यात आले.
संगीत, खेळ व कला विषयक विविध उपक्रम ः श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोटद्वारे १ ते ३० मे दरम्यान श्री क्षेत्र श्रद्धा सागर, अकोट येथे बालसंस्कार व सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन केले आहे. बालसंस्कार शिबिराचे आद्यजनक संत वासुदेव महाराज यांनी बालसंस्कार शिबिराचे गावोगावी आयोजन करून संस्कार रुजवले आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे स्मरण करीत संस्था प्रतिवर्षी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करते. या बालसंस्कार व सर्वांगीण विकास शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक, शिक्षकांची नेमणूक केली होती. शिबिरात आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, ज्ञान- विज्ञान, संगणक प्रशिक्षण, योगासने, प्राणायाम, मनोरंजन, संगीत, खेळ व कला विषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांची मान्यताप्राप्त उपशाखा श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे सुरू होत आहे. या वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ, ३० मे रोजी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींच्या हस्ते झाला. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात नावाची नोंद करावी, असे आवाहन केले आहे.