.
शहरात आज राजमाता जिजाऊ रथयात्रेचे आयोजन उत्साहात झाले. या रथयात्रेचे नियोजन सौरभ खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध समाजबांधव, महिला, युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही यात्रा वाशीम बायपास येथून सुरू होऊन हरिहरपेठ, जुना शहर, शहर कोतवाली, टिळक रोड, अकोट स्टँड, दामले चौक, अग्रसेन चौक मार्गे जिजाऊ हॉल, स्टेशन रोड येथे संपन्न झाली. रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी राजमाता जिजाऊंचे पूजन, जयघोष आणि पुष्पवृष्टी करत नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
अग्रसेन चौक येथे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार सजिद खान पठाण आणि बारा बलुतेदार महासंघाचे अनिल शिंदे यांनी राजमाता जिजाऊंच्या मूर्तीला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला एकतेचा संदेश देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊंचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, अंकुश तायडे, गजानन थुकेकर, कपिल डोके, अंकुश भेंडेकर, निखिल नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.रथयात्रेमुळे शहरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. विविध समाजघटकांनी एकत्र येत एकात्मतेचे आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.