मुंबई येथील वडाळा येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. पोलिसांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा देखील आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोल
.
रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषदेकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांची परवानगी नसताना देखील ही शोभायात्रा विश्व हिंदू परिषदेकडून काढण्यात आली. त्यामुळे पोलिस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांच्यात तणाव निर्माण झाला होता. तसेच यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणावर बोलताना विहिंपचा एक कार्यकर्ता म्हणाला, बांबूच्या काठीने आम्हाला मारण्यात आले. हे असेच सुरू राहिले तर सगळे संपून जाईल. आम्ही यात्रेची तयारी करत होतो. पण पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली. आम्ही त्यांना म्हटले शोभायात्रेची वेळ सायंकाळी चारची आहे, तरी आम्हाला परवानगी द्यावी. मात्र जेवढे कार्यकर्ते उपस्थित होते त्या सगळ्यांना पोलिसांनी घेराव घातला. यावेळी आम्ही फक्त घोषणा देत होतो. यावेळी पोलिसांनी सांगितले आत चालायला, तसे आम्ही निघालो, मग त्यांनी लाठीचार्ज का केला? असा सवाल संतप्त कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
या ठिकाणी बजरंग दल, तसेच इतरही हिंदुत्ववादी संघटना जमल्या असून येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे समजते. मंत्री व भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती. मात्र कुठलीही प्रतिक्रिया न देता गेल्याचे समजते. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.