हिंगोलीच्या जिल्हा न्यायालयात भौतिक सुविधांच्या मागणीसाठी वकिलांनी मंगळवारपासून ता. २२ काळ्या फिती लाऊन कामकाज सुरु केले असून त्यानंतरही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
.
हिंगोली येथील जिल्हा न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली आहेत. मात्र याठिकाणी वकिलांसाठी कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. या प्रकारामुळे वलिकांमधून असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणात आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी सहा वकिलांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ॲड. आर. एन. अग्रवाल, ॲड. पी. के. पुरी, ॲड. एम. एस. साकळे, ॲड. एम. एम. गांजरे, ॲड. ए. यु. चव्हाण, ॲड. एस. एम. पठाडे यांचा समावेश आहे. या समितीने भौतिक सुविधांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय दिला होता.
वकिल संघात ४१७ वकिल सदस्य असतांना केवळ एक हॉल व अपुरे फर्निचर देण्यात आले. त्यामुळे वाढीव फर्निचर देण्यात यावे. नवीन इमारतीमध्ये वकिल व पक्षकारांसाठी उपहारगृहाची व्यवस्था करावी. वकिलांसाठी लॉकर सुविधा द्यावी, वकिलांसाठी अभ्यासिका उभारावी, नोटरी वकिलांना इमारतीमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. ऑनलाईन फाईलिंग साठी इंटरनेट सुविधा द्यावी तसेच महिला वकिलांसाठी आवश्यक सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यानुसार वकिल संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारपासून ता. २२ काळ्या फिती लाऊन कामकाज सुरु केले आहे. शुक्रवारपर्यंत ता. २५ काळ्या फिती लाऊन कामकाज केले जाणार असून त्यानंतरही प्रशासनाने भौतिक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास सोमवारपासून ता. २८ तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील भुक्तर यांनी सांगितले.