मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही. या प्रकरणी आपल्याला वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल, अशी कबुली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिल
.
विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अनुदान 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा मोठा लाभ सरकारला निवडणुकीत झाला. पण आता सरकार आपल्या या आश्वासनावरून मागे फिरताना दिसत आहे. कारण, महायुती सरकार सत्तेत येऊन 6 महिने लोटले तरी या दिशेने अद्याप कोणतेही ठोस पाऊल टाकण्यात आले नाही. उलट या योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार या विभागाचा निधी त्या विभागाला वर्ग करताना दिसून येत आहे.
2100 रुपये देणे शक्य नाही
या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण सध्याची स्थिती पाहता असे करणे शक्य नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. प्रस्तुत योजनेविषयी माझ्याकडे फेब्रुवारी महिन्यात एक फाईल आली होती. त्यावर मी स्पष्टपणे पैसे देता येणार नाही असे लिहिले होते. या योजनेचे सरकारवर बर्डन आले आहे. अजित पवार जाणिवपू्र्वक आमच्या खात्याचा निधी वर्ग करत असतील असे मला वाटत नाही. पण त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी त्यांना चुकीचे ब्रिफिंग करत असतील.
राज्याचे बजेट अडीच लाख कोटींचे आहे. त्यानुसार माझ्या खात्याला 11.8 टक्के म्हणजे 29,500 कोटींचा निधी मिळण्याची गरज आहे. पण आम्हाला केवळ 22,600 कोटींचा निधी मिळाला. उर्वरित निधी येणे अद्याप बाकी आहे. यामुळे माझ्या खात्याला विविध योजना चालवण्यात अडचणी येत आहेत. माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. मी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. तसेच या प्रकरणी अजित पवारांशीही चर्चा केली आहे, असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या संभाजीनगर दौऱ्याची कल्पना नव्हती
उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर महोत्सवाला अजित पवारांनी दांडी मारली. त्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. पत्रकारांनी याविषयी संजय शिरसाट यांना छेडले असता ते म्हणाले की, अनेकदा उपमुख्यमंत्र्यांना एखाद्या कार्यक्रमला जाता येत नाही. कारण, त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेळ दिली असते. पण अजित पवार काल माझ्या मतदारसंघात आले तरी, मला ते माहिती नव्हते. मी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची माहिती मला देणे अपेक्षित होते. पण ती दिली गेली नाही.
पाय छाटून पळ म्हणणे बरोबर नाही
उद्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यात हे सर्व विषय निघणार आहेत. काम करताना एक स्वातंत्र्य हवे असते. केवळ काम कर म्हणायचे आणि निधीच द्यायचा नाही हे बरोबर नाही. पाय छाटून पळ म्हणणे बरोबर नाही. मी माझी व्यथा मांडत आहे. मी पैसा घेऊन घरी जात नाही. मला खाते चालवायचे आहे. पण पैशांअभावी खाते नीटपणे चालवता येत नाही. हे सर्वांपुढे मांडणे गरजेचे आहे. एखादा मंत्री काम करत नसेल तर त्याला काढून टाका. पण निधी नसताना काम करण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असेही संजय शिरसाट यावेळी बोलताना म्हणाले.