शेणाचा लेप दिलेले चारचाकी वाहन ^
.
दिवसेंदिवस वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या उपाययोजना करत असून, गारव्यासाठी घराच्या छतावर हिरवी नेट, कूलर व एसी घराघरात सुरू आहेत. दुपारच्या रखरखत्या उन्हात दुचाकीवरून घराबाहेर पडण्याची हिंमतच होत नाही. त्याऐवजी चारचाकी वाहनात एसी लाऊन प्रवास केला जातो. या कृत्रिम थंडाव्या ऐवजी नैसर्गिक थंडावा हवा, यासाठी तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर (गुरुकुंज) येथील माजी सरपंच पांडुरंग मक्रमपुरे यांनी वेगळी शक्कल लढवली आहे.
त्यांनी कारला बाहेरून शेण, गोमूत्राचा लेप दिला आहे. असे केल्याने कारच्या आत बसून प्रवास करणाऱ्यांची उष्णतेपासून सुटका झाली असून, नैसर्गिक थंडावा मिळत आहे. एकदा दिलेला लेप महिनाभर टिकत असून त्यामुळे गाडीचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे मक्रमपुरे यांनी सांगितले. मक्रमपुरे यांनी देशी गाईच्या शेणाचा लेप लावला असून या लेपामुळे गाडीचे उन्हापासून संरक्षण होत आहे. शिवाय गाडीच्या आतील वातावरण देखील थंड राहत आहे. कोणतेही केमिकल न वापरता देशी गाईचे शेण, पांढरी माती, गोमूत्र, व गवंडा लावल्याने गाडी वारंवार धुवावी लागत नाही. पर्यायाने पाण्याचीही बचत होत आहे. त्यांनी टाटा इंडिका कारला शेणाचा लेप दिला आहे. उन्हापासून रक्षणासाठी त्यांनी केलेला हा अभिनव प्रयोग तिवसा तालुक्यात सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अशी सुचली कल्पनाः पांडुरंग मक्रमपुरे यांचे गुरुकुंज मोझरीनजीक शेत असून त्यांनी शेतात तात्पुरत्या स्वरूपात एक छोटीशी झोपडी उभारली आहे. त्या झोपडीला गाईचे शेण, पांढरी माती व गवंडा याचे मिश्रण करून त्याने सारवण केले आहे. या प्रयोगाने उन्हापासून रक्षण होत असून शिवाय नैसर्गिक थंडावा देखील मिळू लागला. असेच सारवण जर आपल्या कारवर केले तर तीही आतून थंड राहील, अशी कल्पना डोक्यात आली. ती प्रत्यक्षात साकारली.
पांढरी माती व देशी गाईचे शेण याचे मिश्रण करून कारवर त्याचा लेप लावल्यामुळे थेट उष्णता आत जात नाही. हा लेप उष्णता रोधक असल्यामुळे नैसर्गिक थंडावा मिळत असून, उन्हापासून रक्षण होत आहे.
-प्रा.अनिल बंड, हवामान तज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय.
एका आठवड्यापासून उकाड्यापासून दिलासा
घरी असलेल्या चारचाकी वाहनाला देशी गाईचे शेण, गवंडा व पांढरी माती याचे एकत्रित मिश्रण करून व्यवस्थित लावले.यामुळे एक आठवड्यापासून गाडीच्या आतील वातावरण थंड राहत असून उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
– पांडुरंग मक्रमपुरे, माजी सरपंच गुरुदेवनगर गुरुकुंज