NCP SP Leader Prashant Jagtap Welcomes Supreme Court Decision Of Local Bodies Elections | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा: न्यायालयीन लढ्याला यश आले, सर्वोच्च न्यायालयाचे आभार – प्रशांत जगताप – Pune News

0



महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुढील चार आठवड्यात अधिसूचना जाहीर करून पुढील चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या

.

महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील ३४ नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही याचिका दाखल करत न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला तथा राज्य सरकारला सूचना देत पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. याबद्दल आनंद व्यक्त करत प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

प्रशासन राज राबवत जन्मताला डावलण्याचा महायुतीचा प्रयत्न माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उधळून लावला. पुणे शहरातील नागरिकांसह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप म्हणाले.

ओबीसी डेटा लवकर सादर करावा

राज्य शासनाने लवकरात लवकर ओबीसी समाजाबाबत संपूर्ण डेटा दिला तर ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होतील अन्यथा या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी समाजाच्या हितासाठी आग्रही असून महायुती सरकारने लवकरात लवकर निवडणूक आयोगाकडे डेटा सादर करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यास यास सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जबाबदार असतील असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला. राज्य सरकारने ओबीसी समाजाबाबतचा सर्व डेटा लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात सादर करावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज देण्यात आले आहे.

पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी प्रशासन राजच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. लवकरात लवकर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी देऊन हा भ्रष्टाचार समूळ उखडून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तयार आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here