Pakistani Actress Bushra Ansari says to Javed Akhtar You are about to die anyway over Pahalgam Attack – Pressalert

0


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना जावेद अख्तर यांनी शांत राहावं असा सल्ला पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारीने (Bushra Ansari) दिला आहे. एका व्हिडिओमध्ये, तिने जावेद अख्तर यांना या विषयावर भाष्य करणं टाळावं आणि नसीरुद्दीन शाह यांचे अनुकरण करावं असाही सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर तुमचा एक पाय स्मशानात आहे असं आक्षेपार्ह विधानही केलं आहे. याआधी जावेद अख्तर यांनी भारतीय प्रशासनाकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं होतं. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बुशरा म्हणतीये की, “आपले जे लेखक आहेत, त्यांना बोलायला फक्त कारण हवं होतं. खरं तर त्यांनी मुंबईत भाड्याने घरदेखील मिळत नाही. आपलं अस्तित्व सिद्ध कऱण्यासाठी ते हवं तितकं बोलू शकतात. माहिती नाही काय काय बोलत आहेत. काहीतरी लाज बाळगा. तुमच्या मृत्यूला फक्त दोन तास शिल्लक राहिले आहेत. आणि तुम्ही इतक्या निरुपयोगी गोष्टी बोलत आहात. इतकं काय घाबरायचं आहे, इतकी हाव कशाला करता. आता तुम्ही शांत बसा. नसरुद्धीन शाहदेखील आहेत, ते शांत बसलेत ना? इतर लोकही शांत बसले आहेत ना? ज्याच्या मनात जे आहे ते ठेवूदेत. यांचं माहिती नाही, काय करत आहेत”.

दरम्यान जावेद अख्तर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देत योग्य ती कारवाई करावी असं आवाहन केलं आहे. “हे फक्त एकदाच झालेलं नसून, अनेकदा झालं आहे. मी केंद्र सरकारला तात्काळ पावलं उचलण्याची विनंती करतो. सीमेवर काही मोजके फटाके फोडून काही होणार नाही. आता कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. असं काहीतरी करा जेणेकरुन तेथील (पाकिस्तान) मूर्ख लष्कर प्रमुख पुन्हा असं भाषण करु शकणार नाही,” असं जावेद अख्तर म्हणाले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावेद म्हणाले की, पाकिस्तानी कलाकारांना भारतातून बाहेर काढणे म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातात खेळण्यासारखे असेल. पण या मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही असंही त्यांनी कबूल केल. “सध्या, पहलगाममध्ये जे काही घडलं आहे त्यामुळे मनात फारशी मैत्रीपूर्ण भावना नाही. त्यामुळे याबद्दल विचार करण्याची ही वेळ नाही. चांगल्या काळात याचा विचार करता येईल आणि आशा आहे की काही वर्षांनी, त्यांना समजेल आणि पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच त्यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन चांगला असेल,” असं ते म्हणाले.

2023 मध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या आठवणीत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यावरुन सुनावलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट आखणारे येथे मोकळेपणाने फिरत असताना, भारतीयांनी पाकिस्तानी जनतेबद्दल सहानुभूती बाळगण्याची अपेक्षा योग्य नाही असं ते म्हणाले होते. 

“वातावरण शांत करायला हवे. मी मुंबईचा आहे आणि आपण सर्वांनी मुंबईवरील हल्ला पाहिला आहे. हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तचे नव्हते. ते अजूनही तुमच्या देशात आहेत, म्हणून जर एखाद्या भारतीयाने याबद्दल तक्रार केली तर तुम्ही नाराज होऊ नये,” अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना सुनावलं होतं. 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here