वीजबिलांची थकबाकी वाढण्यास पुन्हा सुरवात झाली आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला वेग द्यावा. तसेच नवीन वीजजोडण्या देण्यासह नाव बदलण्याच्या अर्जांवर कार्यवाही करण्याचा वेग आणखी वाढवावा असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी द
.
महावितरणच्या पुणे परिमंडलाची आढावा बैठक गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये झाली. यावेळी मुख्य अभियंता काकडे बोलत होते. याप्रसंगी अधीक्षक अभियंते सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग,ज्ञानदेव पडळकर, संजीव नेहेते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे परिमंडलात लघुदाब वर्गवारीमधील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे गेल्या मार्चमध्ये ६९ कोटी रूपयांची थकबाकी होती. त्यापैकी २२ कोटी ५४ लाख रुपयांच्या थकीत बिलांचा भरणा संबंधित ग्राहकांनी केला आहे. तर ४१ हजार ७९१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. उर्वरित ४६ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी वसूलीसह थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास आणखी वेग द्यावा, असे निर्देश मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी दिले.
पायाभूत वीजयंत्रणा अस्तित्वात आहे अशी ठिकाणी नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यात यावी. तसेच मालकी बदलल्यानंतर वीजबिलांत नाव बदलांचे तसेच पत्ता बदल किंवा वीजभार वाढीचे अर्ज ग्राहकांकडून ऑनलाइन प्राप्त होतात. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. काही कागदपत्रांची कमतरता किंवा आवश्यकता असल्यास अर्ज नामंजूर करण्याआधी संबंधित ग्राहकांना तातडीने कळवून त्याची पूर्तता करावी. नवीन वीजजोडणी, वीजबिलांच्या तक्रारींसह इतर सर्व सेवा ग्राहकसेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीमध्ये देण्यात याव्यात व यासाठी संबंधित विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांनी दैनंदिन पर्यवेक्षण करावे असे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंता काकडे यांनी दिले. यासोबतच वीज वापर कमी दिसून येत आहे अशा व्यावसायिक व औद्योगिक वीजजोडण्यांची तातडीने तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली.
विजेच्या अधिक मागणीच्या कालावधीमध्ये अतिभारित होणाऱ्या वीजवाहिन्यांच्या विभाजनाच्या कामांचा काकडे यांनी आढावा घेतला. तसेच उपस्थित संबंधित एजन्सीजच्या अधिकाऱ्यांना याबाबतची सर्व कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालयप्रमुख अभियंते, वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.