पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने कंपनीतील सहकाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी आरोपी सूरज सुनील फाळके याला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम मृत अमोल खडके यांच्या आईला देण्याचे
.
ही घटना २६ ऑक्टोबर २०२१ ची आहे. कोंढव्यातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सूरज फाळके याने कंपनीतील वादातून सहकारी अमोल खडके याच्या डोक्यात लोखंडी गज मारला. झोपेत असलेल्या अमोलला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवले.
दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात मदत करणाऱ्या सहायक फौजदार महेश जगताप आणि पोलीस कर्मचारी माने यांना परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पीएमपी प्रवासी महिलेचे मंगळसूत्र चोरी
पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर बसस्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला मूळच्या मावळ तालुक्यातील बेबडओहोळ गावच्या रहिवासी आहेत. त्या शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात लोकलने आल्या. रेल्वे स्थानक परिसरातील पीएमपी स्थानकातून त्या बसने निघाल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.