[ad_1]
जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला गेलेल्या एका तरुणाने पहलगाम हल्ला करणारे अतिरेकी हल्ल्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला भेटल्याचा मोठा दावा केला आहे. या तरुणाने आपल्या दाव्याची माहिती एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही दिली आहे.
.
जालन्यातील संजय राऊत हे आपला मुलगा आदर्श व पत्नीसोबत काश्मीरला फिरण्यास गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहलगामला गेले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 एप्रिल रोजी बैसरनच्या पठारावर अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह एकूण 26 पर्यटक मारले गेले. आत्ता संजय राऊत यांच्या आदर्श या मुलाने या हल्ल्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
तुम्ही काश्मिरी दिसत नाही, तुम्ही हिंदू आहात का?
आदर्श राऊतने बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, 21 एप्रिल रोजी मी एकटाच घोडेस्वारी व फिरण्यासाठी बैसरनला गेलो होतो. तिथे मी एका मॅगीच्या स्टॉलवर थांबलो. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने माझ्याशी संवाद साधला. त्याने मला तुम्ही काश्मिरी दिसत नाही, तुम्ही हिंदू आहात का? असा प्रश्न केला. यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्यांना केवळ आम्ही इथलेच असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने स्थानिक काश्मिरी भाषेत ‘आज गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊ’ असा संवाद आपल्या सहकाऱ्याशी साधला. मला त्यांची भाषा कळली नाही. त्यामुळे मी मॅगी स्टॉल चालकाला त्याची विचारणा केली. त्याने मला हे सांगितले.
या प्रसंगानंतर मी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या कुटुंबासह श्रीनगरला पोहोचलो. तेव्हा आम्हाला बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली, असे आदर्शने सांगितले.
तो पुढे म्हणाला, पहलगाम हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी हल्लेखोरांची छायाचित्रे जाहीर केली. त्यातील छायाचित्र माझ्याशी संवाद साधणाऱ्या व्यक्तीशी मिळते-जुळते होते. त्यामु्ळे मी लगेचच एनआयएला ईमेल करून त्याची माहिती दिली. आदर्श राऊत याच्या या दाव्यामुळे अतिरेकी पहलागममध्ये 21 एप्रिल रोजीच हल्ला करणार होते, पण गर्दी कमी असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी हल्ला केला असे स्पष्ट होते.
घटनास्थळी एकही सुरक्षा जवान नव्हता
उल्लेखनीय बाब म्हणजे आदर्शचे वडील संजय राऊत यांनी यावेळी हल्ला झालेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याचेही प्रामुख्याने अधोरेखित केले. ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. सुरक्षा व्यवस्था असती तर कदाचित हा हल्ला टाळता आला असता, असे ते म्हणाले.
नांदेडच्या लोलगे दाम्पत्याने सांगितला थरारक अनुभव
दुसरीकडे, नांदेडच्या लोलगे दाम्पत्यानेही या घटनेचा थरार सांगितला आहे. नांदेडचे कृष्णा लोलगे व त्यांची पत्नी साक्षी लोलगे हे 22 एप्रिल रोजी पहलगाममध्येच होते. हल्ला झाला तेव्हा ते बैसरनच्या पठारावरून खाली उतरत होते. रस्त्यात त्यांना वर होणाऱ्या गोळीबाराचा आवाज ऐकू आला. कृष्ण लोलगे आपला अनुभव सांगताना म्हणाले की, आम्ही पहलगाम येथे जवळपास तास-दीड तास फिरलो. त्यानंतर घोड्यावर बसून खाली येत असताना आम्हाला गोळीबाराचा आवाज आला. रूमवर गेल्यानंतर समजले की, हा अतिरेकी हल्ला होता. त्यानंतर आम्ही एकदम घाबरलो. आम्ही तिथे होतो तेव्हा जवळपास 2-3 हजार पर्यटक तिथे असतील, असे कृष्णा यांनी याविषयी बोलताना सांगितले. लोलगे दाम्पत्य आजच जम्मू काश्मीरहून नांदेडला पोहोचले.
[ad_2]