पोहेगांव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील शहरालगत असलेल्या जेऊर पोटोदा परिसरात डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही डुकरे कोणाची हे कोडे अद्यापही उलगडले नाही. ऐन सणासुदीच्या दिवाळीच्या धामधुमीतही या डुकरामुळे अनेकांना त्रास होतो आहे. या डुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गेल्या काही दिवसापासून होत आहे मात्र वनविभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
या परिसरात कुत्र्यांपेक्षा डुकरांची संख्या जास्त असल्याने डुकरांचे मरण्याचे प्रमाण देखील जास्त आहे प्रत्येक आठवड्यात एक दोन डुकरे ही मरतात. त्यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्याला त्रास होतो. हे सर्व टाळण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच मनिषा केकाण, माजी सरपंच सतीश केकाण व सदस्य व ग्राम विकास अधिकारी श्री थोरात हे सदैव तत्पर असतात. साधारण एका मृत डुकराची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना जवळपास 500 ते 600 रुपये खर्च येतो. त्यामुळे अधिकचा खर्चाचा बोजा ग्रामपंचायतीलाच सोसावा लागतो. वन विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या डुकरांची गणना करून त्यांची योग्य ठिकाणी वन परिसरात रवानगी केली पाहिजे अशी मागणी होत आहे.