उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा आहेत. त्यांच्या डोक्यात सदा न कदा केवळ घोटाळ्यांचेच विचार येतात, असा घणाघात भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना केला आहे.
.
मुंबईतील गरवारे क्लबमध्ये नुकतीच भाजपची कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मुंबई मनपा उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 वर्षे होती. सद्यस्थितीत मुंबईतील एक चौरस फुट क्षेत्रफळाच्या जागेला लाखोंची किंमत आहे. पण ठाकरे यांनी पालिका ताब्यात असताना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकट बिल्डरांच्या घशात घातले. त्यामुळे त्यांना आम्हाला कोणताही जाब विचारण्याचा अधिकार नाही.
उद्धव ठाकरे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा आहेत. त्यांच्या डोक्यात सतत लँड व लँड स्कॅमचे विचार येतात. त्यांनी सध्या काही नवीन बोलणेच सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अंबानीला दिली, ती जमीन अदानीला दिली असेच बोलत राहतात.
वक्फ बोर्ड कायद्यावरूनही केली टीका
आशिष शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून वक्फ कायद्यावर खोटी माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे वक्फ बोर्ड कायद्याविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत. तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणारे असे ते म्हणत आहेत. पण या देशात कायदा आहे. त्यामु्ळे तसे काहीही करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्याचे काम करत आहे. आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात होतो. पण आम्ही केव्हाच संसदेचे कायदे मानणार नाही असे म्हणालो नाही.
मुस्लिम स्वतः या प्रकरणी पुढे येऊन मोदींचे कौतुक करत आहेत. जे मुस्लिम समाजाल व्होट बँक समजतात तेच लोक याला विरोध करत आहेत. जे लोक नाटक करत आहेत त्यांची एक यादीच आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. त्यांना आम्ही उघडे पाडणार आहोत. कायदा बनला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिम लोकांना कसा फायदा होणार ते आम्ही पाहू. वक्फ कायदा हे एक क्रांतिकारी यश आहे. आज वातावरण प्रतिकूल आहे असे तुम्हाला वाटेल, पण काळ दाखवून देईल की मोदी बरोबर होते, असेही शेलार यावेळी वक्फ बोर्ड कायद्याचे समर्थन करताना म्हणाले.