Shivalik Sharma : सध्या सर्वत्र IPL 2025 ची धूम सुरु असून मुंबई इंडियन्स टॉप फोरमध्ये पोहोचली आहे. पण मुंबई इंडियन्स संघाच्या एका माजी खेळाडूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी करून आयपीएलमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या या खेळाडूचं करिअर संकटात आलं आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका तरूणीने गुजरातमधील एका आयपीएल क्रिकेट खेळाडूविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. या खेळाडूचं नाव शिवालिक शर्मा असं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
यासंदर्भात एसीपी आनंद राजपुरोहित याप्रकरणात सांगितलं की, सेक्टर दोन, कुडी भगतासनी येथील रहिवासी असलेल्या एखा तरुणीने क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सदर तरुणी 2023 साली फेब्रुवारी महिन्यात बडोदा इथे फिरायला गेली होती. तिथे तिची शिवालिक याच्याशी भेट झाली. पहिले मैत्री नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांमध्ये फोनवरून तासनतास बोलणं सुरु झाले. त्यानंतर 2023 मध्ये या दोघांच्याही कुटुंबीयांची भेटगाठी झाल्यात. कुटुंबाने या दोघांचा साखरपुडा ठरवला अन् त्यांचा साखरपुडा संपन्न झाल. साखरपुड्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर शिवालिक याने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात या तरुणीला भेटण्यासाठी बडोदा इथे बोलावले. तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी आपला मुलगा आता हे नातं पुढे नेऊ शकत नाही, असे तिला सांगण्यात आलं. त्यानंतर संतापलेल्या तरुणीने या प्रकरणी शिवालिकविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
बडोदा संघाकडून पदार्पण!
28 नोव्हेंबर 1998 रोजी बडोद्यामध्ये जन्मलेल्या शिवालिक शर्माला अभ्यासात फारसा रस नव्हता तर त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्याची पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्याने 2016 मध्ये बिन्नू अंडर 19 ट्रॉफीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, 2018-19 मध्ये, त्याने रणजी ट्रॉफी हंगामात बडोद्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दोन अर्धशतकांसह 322 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 29.27 आहे. याशिवाय त्याने 19 देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये त्याने दोन अर्धशतकांच्या मदतीने 349 धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफीमध्ये बॅटने कहर
रणजी ट्रॉफीमध्ये शिवालिकला अधिक ओळख मिळाली. त्याने 2018 मध्ये यात पदार्पण केले. त्याने 18 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 27 डावांमध्ये तीन शतकं आणि 5 अर्धशतकांसह 1087 धावा केल्या. त्याची सरासरी 43.48 होती. एकेकाळी त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात होतं. यामुळे, त्याला 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना खरेदी केलं. पण गेल्या काही काळापासून तो क्रिकेटपासून दूर होता. या हंगामापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सने सोडलं होतं.