.

संस्कार शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचे जीवन चरित्र, ध्यान प्रार्थनेची उपासना व राष्ट्रपुरुषांचे धडे शिकवून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची बीजे पेरली जातात. बालपणातच संत विचार विद्यार्थ्यांच्या मनावर कोरल्यास ते ही आदर्श दिनचर्या जगतील व घरच्यांनाही समजावून सांगतील. या माध्यमातून एका सृजनशील समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन श्रीगुरुदेव आध्यात्म गुरूकुलमध्ये आयोजित सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अरविंद काळमेघ यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव गव्हाळे महाराज होते. शिबिरामध्ये विदर्भ, तेलंगणा, मध्य प्रदेशातून १५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
बालकांवर संत महापुरुषांच्या विचारांचे संस्कार करून त्यांना देशाचा उत्तम नागरिक बनवण्याचे कार्य श्रीगुरुदेव सेवा मंडळ सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून करत आहे, असेही काळमेघ म्हणाले.
विद्यार्थ्यांची दिनचर्या पहाटे ५ पासून सुरू होत असून, सामुदायिक ध्यान, योग-प्राणायामाने दिवसाची सुरुवात होते तर दिवसभरात संत साहित्याच्या अध्ययनासोबत संगीताचे ज्ञान, स्वसंरक्षणार्थ लाठी-काठी, जुडो, कराटे, मल्लखांब, रोप मल्लखांब, मंकी बार इत्यादी मैदानी खेळाचे देखील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव हे स्वतः विद्यार्थ्यांना बौद्धिक तासिकेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या साहित्याची शिकवण व वक्तृत्वाचे धडे देणार आहेत. योग प्राणायाम प्रशिक्षक म्हणून मुकेश कोल्हे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना भजन संगीत शिकवण्यासाठी प्रज्ज्वल टोंगे व शिबिर व्यवस्थापक म्हणून तुलसीदास झुंजुरकार व रूपेश प्रधान, आर्यन बोबडे जबाबदारी पार पाडत आहेत.
स्वसंरक्षणार्थ जुदो, कराटेचे प्रशिक्षण मेजर बंडू खडसे व आर्यन खडसे देत असून लाठीकाठीचे प्रशिक्षण हर्ष बारापात्रे व स्वप्नील बारापात्रे देत आहे. हे संस्कार शिबिर पूर्णतः लोकसहभागावर अवलंबून असून, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अनेक शाखांच्या माध्यमातून या ठिकाणी धान्य पाठवले जाते तर अनेक देणगीदारांनी एक वेळ जेवणाचा पंगतीचा खर्च देऊन या ठिकाणी सहकार्य केल्याचे दिसून येते.
आजवर २ लाख विद्यार्थ्यांवर संस्कार आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी संस्कार शिबिरातून संस्कारित होऊन गेलेले आहेत. ते ज्या क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत, तेथे त्यांना या संस्काराचा निश्चितच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःचे नावलौकिक केले असून, यशाची पताका ते उंचावत आहेत. संस्कारातूनच मोती घडत असतात, असे गौरवोद्गार नामदेव गव्हाळे महाराज यांनी काढले.