.
अनेक वर्षांपासून कुपोषणासारख्या गंभीर समस्येच्या विळख्यात असणाऱ्या मेळघाटात सिकलसेल, ॲनिमिया हा आजार आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात जडतोय. या जीवघेण्या आजाराला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशातच ऑर्गनायझेशन फॉर कुला ही स्वयंसेवी संस्था देखील आदिवासी बांधवांना या आजारापासून सुटका करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
दुर्गम गावांना भेट देणे, तेथे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचे रुग्ण शोधून त्यांना योग्य मार्गदर्शनाद्वारे मदतीसाठी संस्थेचे काम सुरू आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये सिकलसेल, ॲनिमिया हा आजार मागील काही वर्षांपासून वाढतो आहे, असे आरोग्य विभागाच्या लक्षात आले आहे. सिकलसेल ॲनिमिया हा आजार आनुवंशिक आहे. आई आणि वडिलांना हा आजार असेल तर त्यांच्या मुलांना देखील हा आजार होवू शकतो. चिखलदरा तालुक्यात जवळपास ३०० जणांना या आजाराची लागण झाली असल्याची माहिती ऑर्गनायझेशन फॉर कुलाचे अध्यक्ष राकेश महल्ले यांनी दिली.
२०२१ मध्ये संस्थेची स्थापना झाली मात्र, त्यापूर्वीपासून संस्थेचे पदाधिकारी या भागात सामाजिक कार्य करत आहे. संस्थेतील अकोला, नाशिक, पुणे या शहरातून जुळलेल्या सदस्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाला मदत होईल. यासाठी आता विविध गावात आरोग्य शिबिर घेऊन सिकलसेल ॲनिमियाचे रुग्ण शोधून उपचार करण्यात येत आहे. असेही राकेश महल्ले यांनी सांगितले.
मेळघाटात राबवण्यात येणाऱ्या संस्थेच्या अन्य सेवा
आता आरोग्य विभागाच्या साहाय्याने सिकलसेल रुग्णांना उपचारासाठी प्रयत्न करत आहे. ऑर्गनायझेशन फॉर कुला ही संस्था मागील काही वर्षांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्य करत आहे. कोरोना काळात वन मजुरांना रेशन किट वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, अतिदुर्गम भागातील गावांमध्ये जाऊन वन्य जीवांवर आधारित डॉक्युमेंट्री दाखवणे, व्याघ्र प्रकल्पामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी पॉलिथिनचे वाटप, वनमजुरांना जोडे वाटप आदी समाजसेवी उपक्रम संस्था राबवत आहे.