.
जगज्योत ससाणची ७५ धावांची अर्धशतकी खेळी तसेच क्षितीज दहियाच्या ४५ धावांच्या आधारे दुसऱ्या उपांत्य सामन्यात यवतमाळ संघाने यजमान अमरावतीवर ४ गड्यांनी मात करून आंतर जिल्हा टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम फेरीत यवतमाळला जेतेपदासाठी वर्धा संघाविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत.
विदर्भ क्रिकेट संघटना, अमरावती जिल्हा क्रिकेट संघटना व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना अमरावतीने २० षटकांत ९ फलंदाज गमावून १५९ धावा उभारल्या. संघाची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे बहरली नाही. याचे श्रेय यवतमाळच्या गोलंदाजांना जाते. त्यांनी अचूक दिशा व टप्प्याचा मारा करून यजमान अमरावतीच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या यवतमाळ संघाने १८.३ षटकांत ६ फलंदाज गमावून १६२ धावांसह सहज विजय मिळवला. अमरावतीच्या फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यामुळे जगज्योत ससाणने ६ षटकार ३ चौकारांच्या मदतीने ४२ चेंडूत ७५ धावांची आक्रमक खेळी करून यवतमाळ संघाच्या विजयात सिंहाचा वाटा घेतला. त्याचप्रमाणे क्षितीज दहियाने २ षटकार व ४ चौकारांसह ३२ चेंडूत ४५ धावा फटकारल्या. त्यामुळे यवतमाळला अंतिम फेरीत धडक देता आली.
स्पर्धेद्वारे खेळाडूंचा सराव ः या टी-२० स्पर्धेत विदर्भातील सर्वच अग्रणी क्रिकेटपटू सहभागी झाल्यामुळे प्रत्येक संघाला खेळण्याचा उत्तम सराव मिळाला. तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या आयकॉन खेळाडूंची फलंदाजी, गोलंदाजी जवळून बघण्याची संधी मिळाली. याचा फायदा बहुतेक संघातील खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरी सुधारण्यास झाला. प्रत्येक संघातील सर्वोत्तम खेळाडूंचा खेळही टर्फ विकेटवर बहरला. त्यामुळे या खेळाडूंमधील प्रतिभेचीही जाण झाल्याची माहिती अमरावती जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. दिनानाथ नवाथे यांनी दिली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर सुरू असलेला क्रिकेट सामना.