गोंदवले प्रतिनिधी : – गोंदवले खुर्द येथे सातारा लातूर महामार्गालगत असलेल्या गटारांचे काम व्यवस्थित न झाल्यामुळं गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन थेट लोकांच्या घरात घुसले आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या या सुमार दर्जाच्या कामामुळे ऐनवेळी आलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे त्याठिकाणहून चालले असता त्यांना ही परिस्थिती बघवली नाही. त्यांनी त्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न करून पाण्याला वाट मोकळी करून दिली. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, आदर्श कट्टे, स्थानिक पोलिस पाटील सचिन अवघडे यांचीही साथ त्यांना लाभली. रस्त्यावरून पाणी वाहत असताना अनेक वाहने बंद पडली. यावेळी ती वाहनेही ढकलून बाहेर काढण्यासाठी धैर्यशील पाटील आणि साथीदारांनी प्रयत्न केले.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अवघडेवस्तीमधील अंगद अवघडे, राजेंद्र अवघडे आणि आनंदा अवघडे यांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जनावरांनाही याचा मोठा फटका बसला.
ही एकंदरीत परिस्थिती पाहून धैर्यशील पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वस्तुस्थितीची माहिती देऊन कंपनीच्या सुमार दर्जाच्या कामाप्रती संताप व्यक्त केला. इथली परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही तर आंदोलनाचा करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाठवून परिस्थिती हाताळण्याचे आश्वासन दिले. धैर्यशील पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे स्थानिकांनी त्यांना धन्यवाद दिले.