देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बीट अंमलदार बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे अन्यथा येत्या ८ दिवसांत पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिला आहे.
यावेळी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,जे काम पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी करावे असे काम राहुरी फॅक्टरी येथील स्थानिक महिलांनी व तरुणांनी करून दाखवून पोलीस कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा व कर्तव्यात करत असलेला कसूर जनतेसमोर आला आहे.राहुरी फॅक्टरी बीटातील पोलिस अंमलदार बाबासाहेब भागा शेळके व प्रवीण अशोक बागुल यांचे बीटात अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे त्यांच्या बी राजरोसपणे अवैध दारू विक्री,मटका,जुगार असे प्रकार घडत असतात.परंतु कुंपणच शेत खात असल्यामुळे सदर बाबी बाबत दाद मागणार तरी कुणाला असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडत आहे.त्यामुळे सदर बीटात अवैध धंद्यांचा मोठा कारभार घडत आहे.
मागील पंधरवड्यात राहुरी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी राहुरी फॅक्टरी येथे छापा टाकण्यासाठी गेले असता पोलिस कर्मचारी व झिरो पोलिसाने (खबरी) यांनी अवैध दारू धंदेवाल्यांना संपर्क साधून पूर्वसूचना देऊन सावध केले.व अवैध दारू धंद्याबाबत निवेदन देणाऱ्या स्थानिक महिलांना तोंडघशी पाडले.महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी छापा तर मारला परंतु सगळे काही प्लॅनिंग असल्यामुळे पोलिसांनी छापा मारण्याचे फक्त नाटक केले.या सर्व बाबीत पोलीस सामील असल्यामुळे संतप्त महिलांनी स्वतःच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला व पोलिसांचा नाकर्तेपणा दाखवून दिला.या सर्व प्रकारची नक्की कोण पाठराखण करत आहे याचा तपास होणे गरजेचे आहे.
अवैध धंदे चालकांचे व संबंधित बीट अंमलदार बाबासाहेब भागा शेळके व प्रवीण अशोक बागुल यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे सदर अवैध दारु विक्रेते व पोलिस कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स काढून पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई करावी.बीट अंमलदार प्रवीण अशोक बागुल यांचे पूर्वीपासून गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हेगारांशी खूप जवळचे संबंध असल्यामुळे सदर निवेदन दिल्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास हे दोन पोलिस कर्मचारी म्हणजेच पोलिस अंमलदार बाबासाहेब भागा शेळके व प्रवीण अशोक बागुल हे जबाबदार राहतील याची नोंद गांभीर्याने घेण्यात यावी व सदरच्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येत्या ८ दिवसांत पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या दालनासमोर आमरण उपोषण किंवा योग्य ते आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिला.