जागतिक पुस्तकदिनी विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृतीचा ठेवा आता खुला
नगर – दोनशे वर्षाकडे वाटचाल करणार्या नगरच्या ऐतिहासिक जिल्हा वाचनालयाच्यावतीने ‘जागतिक पुस्तक दिना’चे औचित्य साधून आठवीपर्यंत शिकणार्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना बाल वाचनालयाचे मोफत सभासदत्व देऊन वाचन संस्कृतीचा हा ठेवा खुला केला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी दिली. याचा शुभारंभ वाचनालय व रोटरी ई-क्लब एम्पॉयरिंगच्या बाल शिबीरात करण्यात आला.
जगविदख्यात महान लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जागतिक पुस्तके दिनी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी उपाध्यक्ष दिलीप पांढरे, किरण आगरवाल, प्रा.मेधा काळे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ.अमोल बागुल, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, राहुल तांबोळी, रोटरी इ-क्लबच्या अध्यक्षा नंदिनी जग्गी, समन्वयक डॉ.बिंदू शिरसाठ, गणेश अष्टेकर, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.
या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या वय वर्ष 13 पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना बाल वाचनालयाचे मोफत सभासदत्व देण्यार येणार आहे. या माध्यमातून सुमारे 25 हजार पुस्तकांचा खजिना उपलब्ध होणार आहे. यामध्ये कथा, राष्ट्र पुरुष, विज्ञान, नामवंत लेखक, विनोदी, कला यासारख्या असंख्य पुस्तकांचा समावेश असल्याचे प्रा.मोडक यांनी सांगितले.
सुटीच्या दिवसात तसेच सातत्यपुर्ण वाचन करुन जीवन समृद्ध करण्यासाठी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकेत फाटक, कुमार गुंटला, वर्षा जोशी, विठ्ठल शहापुरकर, संजय गाडेकर, शेख, सिकंदर यांचे सहकार्य लाभले. शेवटी गणेश अष्टेकर यांनी मानले.