सातारा/अनिल वीर : एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळलेला असल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती या विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्या जागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे.
अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या कृतीचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती निषेध करत आहे.कृतीतून निषेध व्यक्त करण्यासाठी, ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ असे अभियान राबवणार आहे. अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार आणि वंदना माने यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे.
” पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली? याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते. टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली ? यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे.ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून होते. मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला ? यांची योग्य माहिती नसल्याने होतो.त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्प्पती मागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी- सातवीच्या विद्यार्थ्याला ह्या विषयी प्रश्न पडू लागतात.त्यामुळे टप्प्याटप्प्याने माहिती शालेय अभ्यास क्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांच्यामध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे. असे देखील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांच्यामध्ये हा उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांती या विषयी विशेष कोर्स देखील शिकवले जातात. अशा पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत हा दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे जे विद्यार्थी दहावी नंतर विज्ञान ही शाखा घेणार नाहीत. त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही.देशभरतील अठराशे वैद्यानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे.सदरच्या पत्रकावर भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे, विलास भांदिर्गे, कुमार मंडपे आणि प्रमोदिनी मंडपे यांच्या स्वाक्षरी आहेत.
उत्क्रांती विषयावर शालेय मुलांच्या साठी पुस्तिका प्रकाशन,
विज्ञान शिक्षकांच्या साठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा, NCERT ला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे.