मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. या कोस्टल रोडला आता छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “संभाजी महाराजांना हरवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्या शौर्याबाबत काही इतिहासकारांनी काही चुकीच्या गोष्टीही लिहिल्या आहेत. पण मुळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला, त्यानंतर संभाजी महाराजांनी त्यावर कळस चढवला. छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक पराक्रम केले. त्यांच्या शौर्याची आठवण आपण जतन करणं आवश्यक आहे, असं शिंदे म्हणाले.
औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे सरकार आल्यानंतर आपण सर्वात आधी हा निर्णय घेतला. आता मुंबईतील कोस्टल रोडलाही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येईल. तसंच कोस्टल रोडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा एक दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल.
काय आहे कोस्टल रोड प्रकल्प?
कोस्टल रोडसंदर्भात महत्त्वाची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईच्या सागरकिनाऱ्याने दक्षिण-उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतुक कोंड़ीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं.
मरिन ड्राईव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरू होणारा हा मार्ग गिरगाव चौपाटीजवळ जमिनीखालील बोगद्यात शिरेल आणि मलबार हिलच्या पलीकडे जाणार आहे. तिथून हाजी अली मार्गे वरळीपर्यंत जाणाऱ्या या रस्त्यासाठी भराव टाकण्याचं काम मुंबई महापालिकेनं सुरू केलंय.
हा रस्ता पुढे वरळी-वांद्रे सी लिंकवरून प्रस्तावित वांद्रे ते वर्सोवा बोरीवली या सागरी सेतूला जाऊन मिळेल.
मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आठ मार्गिकांच्या रस्त्याला लागूनच लोकांना चालता येईल असा मार्ग, पार्किंग आणि बागेसाठीही जागा तयार केली जाणार आहे.