पदकं गंगेत विसर्जित न करण्याचा कुस्तीगीरांचा निर्णय, नरेश टिकैत यांची मध्यस्थी

0

बृजभूषण सिंहांविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीरांनी त्यांची पदकं हरिद्वारला गंगेत विसर्जिक करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार सर्व कुस्तीगीर हरिद्वारला गंगाकिनारी दाखल झाले होते. पण, किसान युनियनचे नेते नरेश टिकैत यांनी तिथं जाऊन सर्वांची समजूत काढली.

त्यानंतर ही पदकं नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

आम्ही शेतात काम करत होतो. आम्हाला जसं माहीत पडलं तसं आम्ही लगेचच त्यांना रोखण्यासाठी इथं आलो, असं नरेश टिकैत यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

तसंच बुधवारी खाप पंचायतची बैठक बोलावण्यात येईल त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल, हा आमच्या मुलीसुनांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या कुस्तीगीरांनी सरकारला 5 दिवसांची मुदत दिली आहे. 5 दिवसांमध्ये बृजभूषण यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल उचलण्याचा इशारा कुस्तीगीरांनी दिला आहे.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार केली आहे.

सत्तेच्या नशेत आणि अंहकारात हे सरकार मशगूल आहे. मुलींना भाजपापासून वाचवायचं आहे, असा विचार आता पालक मुलींना ट्रेनिंगला पाठवण्याआधी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

बजरंग पुनिय यांनी ट्विट केलं होतं, “ही पदकं आता आम्हाला नको कारण हे आमच्या गळ्यात घालून मुखवटा बनवून आमच्या माध्यमातून प्रचार केला जातो आणि मग आमचंच शोषण केलं जातं. या शोषणाविरुद्ध आम्ही बोललो आम्हाला तुरुंगात जायची तयारी करायला सांगितलं जातं.

“आम्ही आमची पदकं गंगेत वाहवण्यासाठी जात आहोत कारण ती गंगा आहे. जितकं आम्ही तिला पवित्र मानतो तितक्याच पवित्रतेने आम्ही कष्ट करून ते कमावलं होतं.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मात्र पदकं गंगेत विसर्जित करायला विरोध केला आहे. त्यांनी पैलवानांना आवाहन केलं आहे की, त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सर्व पदकं त्यांच्याकडे सुपूर्द करावीत.

ही पदकं देशाची आहेत, त्यामुळे ती राष्ट्रपतींकडे द्यावीत असं त्यांचं म्हणणं आहे.

येत्या काही दिवसांमध्ये आम्ही पुन्हा एकदा आंदोलन उभं करू असंसुद्धा त्यांनी म्हटलंय. हरियाणा तकशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

शाब्दिक चकमक

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त एन.सी अस्थाना आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध पेटलं. वेळ पडली तर बंदुकीच्या गोळ्या सुद्धा खाऊ अशा आशयाचं ट्विट बजरंग पुनियाने केलं होतं. त्यावर “गरज पडली तर गोळ्यासुद्धा घालू पण तुमच्या सांगण्यावरून नाही. आता फक्त कचऱ्याच्या पोत्यासारखं फेकलं आहे. कलम 129 नुसार पोलिसांकडे गोळ्या घालण्याचा अधिकार सुद्धा आहे. योग्य वेळी ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल. मात्र हे सगळं माहिती होण्यासाठी शिक्षित असणं आवश्यक आहे. भेटू मग पोस्ट मार्टम टेबलवर’

यावर बजरंग पुनियाने प्रत्युत्तर दिलं आहे. तो म्हणतो, “हा ऑफिसर आम्हाला गोळी मारण्याची भाषा करत आहे. आम्ही समोर उभे आहोत. कुठे यायचं आहे गोळी झेलायला ते सांग. शपथ सांगतो की छातीवर घेऊ गोळी.” आमच्याबरोबर आता हेच करायचं राहिलं असेल तर हेही ठीक असं तो पुढे म्हणतो.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय दंड संहितेच्या 147, 149, 186, 188, 332, 353 आणि पीडीपी अक्ट कलम 3 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविवारी रात्री काही कुस्तीपटू जंतरमंतर इथे आले होते. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारत परत पाठवलं.

रविवारी राजधानी दिल्लीत नव्या संसदेचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कुस्तीपटूंनी नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित केली होती. पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव या महापंचायतीला परवानगी नाकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here