कडेगांव दि.9 (प्रतिनिधी)* बहुजन समाजातील गोरगरीब शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरातील अंधकार नाहीसा करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून डॉ.बापूजी साळुंखे यांनी 1954 साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाची सोय करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले म्हणून महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन प्र.प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांनी केले.
ते आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीला इंगवले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. सौ. संगीता पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र महानवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.दत्तात्रय थोरबोले, प्रशासकीय अधिकारी विक्रम देसाई, प्रा. डी.ए. पवार उपस्थित होते.
डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानमंदिरे उभा करताना ज्या भागात जाण्यासाठी रस्ता देखील नाही अशा दुर्गम भागात शाळा, महाविद्यालये उभा करून शिक्षणाची सोय केली असे सांगून डॉ. बापूराव पवार पुढे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणक्षेत्रात विद्यार्थी ज्ञानाबरोबरच संस्कार शील झाला पाहिजे म्हणून ज्ञान व विज्ञान बरोबरच त्याला सुसंस्काराची जोड देऊन समाज संस्कार शील बनविण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले. म्हणून ज्ञानाला विज्ञानाची व विज्ञानाला सुसंस्काराची जोड देऊन महाराष्ट्र घडविण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले, असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. सूरज डुरेपाटील यांनी केले.