वडूज प्रतिनिधी : पडळ (ता.खटाव) येथे दोन चार चाकी वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान करून चार जणांना जखमी केल्याप्रकरणी दोन्ही वाहन चालकांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायणी ते म्हसवड (ता.माण) रस्त्यावर ढोकळवाडी गावच्या हद्दीत शनिवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसवडहून मायणीच्या दिशेने चार चाकी क्रमांक (एम.एच. ४२ ए.क्यू.३०४९) दोन बैल घेऊन व पाच ते सहा लोकांना घेऊन येत होती.
यावेळी पडळहून विखळे गावाकडे दुसरी चारचाकी क्रमांक (एम.एच.१४ एल.बी.७३५२) जात होती. या वाहनामध्ये चार ते पाच प्रवासी होते. पडळ फाटा येथील चौकात ही दोन्ही वाहने आल्यानंतर त्यांच्यात अपघात झाला.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच चार जण जखमी झाले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहने चालवून वाहनांच्या नुकसानीसह दोन्ही वाहनांतील लोकांना किरकोळ व गंभीर जखमी केल्याप्रकणी वाहन चालक धनाजी मारूती निकम (रा. खुडूस ता. माळशिरस, जि. सोलापूर ), रोहीत दत्तात्रय पंके (रा. निगडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक प्रविण तानाजी सानप यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे अधिक तपास करीत आहेत.