सातारा : पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता हा सद्य:स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता पुढील १५ दिवस पुर्ण बंद करण्याचे आदेश रायगड – अलिबागचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत.
त्यामुळे पोलादपूर- महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे आदी परिस्थितीबाबत वाहतुकीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेऊन मगच आंबेनळी घाट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. हा घाट रस्ता बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल दर १५ दिवसांनी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड- अलिबाग व उपविभागीय अधिकारी महाड यांनी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तात्काळ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. लोकांचे जीव वाचविणे या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी सूचना सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी नदी, नाल्यांवरील अतिक्रमणे, गाळ काढण्याची मोहीम जिल्ह्यात सर्व ठिकाणी हाती घेण्यात यावी. यामध्ये पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा. नगरपालिकांनी शहरी भागात ही मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. पूर प्रवण, दरड प्रवण क्षेत्रासाठी दिलेले साहित्य तपासून घेऊन आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा. पाऊस, पूर यामुळे बाधित झालेल्या रस्त्यांची कामे जवळच्या यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.