आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही – आ.आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर – आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील आदिवासी महिलेला चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या वैद्यकीय उपचार आणि सुविधेमुळे आपले प्राण गमवावे लागले असून या दुर्दैवी घटनेतील सर्व दोषींवर तातडीने निलंबनाची कारवाई करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाचे विभागीय आरोग्य अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथून प्रसुतीसाठी आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेला चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अती रक्तस्राव होवून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महिलेच्या कुटुंबाची आ. आशुतोष काळे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे व शासनाच्या वतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. यावेळी गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक श्रीराम राजेभोसले, तसेच प.स. माजी उपसभापती अनिल बनकर आदि उपस्थित होते.
सदरच्या दुर्दैवी घटनेची यापुढील काळात पुनरावृत्ती होवू नये यासाठी कोपरगाव येथे तहसीलदार संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विभागीय आरोग्य अधिकारी सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांच्या समवेत बैठक घेवून घटनेतील सर्व दोषींवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी केली. आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे या महिलेचा मृत्यू झाला असून आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याच्या प्रकाराबद्दल आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत संताप व्यक्त केला आहे. यापुढे कोपरगाव तालुक्यात आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार सहन केला जाणार नाही. यापुढील काळात असा हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही अशी तंबी दिली असून सर्व दोषींवर तातडीने निलंबनाची कारवाई करा अशी मागणी केली आहे.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे, सुरेश जाधव,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, बाळासाहेब बारहाते, माजी उपसभापती अर्जुनराव काळे, नंदकिशोर औताडे आदी उपस्थित होते.