सातारा/अनिल वीर : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन वयाच्या 70 व्या वर्षी झाले आहे.त्यांना क्रांतिदिनी ठिकठिकाणी आदारांजली मान्यवरांनी अर्पण केली.
मुंबईतील एशियन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला होता. त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले.त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा याचा समावेश आहे.