–सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा: पराग संधान, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे यांची मागणी
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराण या ग्रंथाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजबांधवांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन या उपोषणास व मुस्लिम समाजाने केलेल्या न्यायिक मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन, कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केल्याची घटना अतिशय निंदनीय असून, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी केली. याबाबत तातडीने योग्य कारवाई व्हावी. कारण सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण दूषित होते तसेच हे केवळ कुराणबद्दल नाही तर इतर कोणत्याही धर्माच्या बाबतीत घडू नये, असे मत अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले.
कोपरगावातील हिंदू, मुस्लिम व इतर सर्व जाती-धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून सण, उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करतात; पण कोळगाव थडी येथे काही अज्ञात समाजकंटकांनी मुस्लिम बांधवांच्या कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना करून समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे, तो निषेधार्ह आहे. आज समाजकंटकांनी कुराण या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केली, अशा अपप्रवृत्तींवर वेळीच कडक कारवाई न केल्यास भविष्यात इतर धर्माच्या बाबतीतही असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई होत नाही व उपोषणकर्त्या मुस्लिम समाजबांधवांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.