भाषण कलेत विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास अत्यंत महत्वाचा -सौ.पुष्पाताई काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे युग आहे त्या  पार्श्वभूमीवर भाषण कला आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे अनिवार्य बनले असून भाषण करीत असतांना भाषणातील चढ उतार योग्य वेळी होणे गरजेचे आहे.आपले भाषण चांगले व्हावे असे प्रत्येक वक्त्याला वाटत असले तरी त्यासाठी वाचन व विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास भाषण कलेत अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ट महाविद्यालयात स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी सौ.पुष्पाताई काळे बोलत होत्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सतिश वैजापूरकर उपस्थित होते.

पुढे बोलतांना सौ.पुष्पाताई काळे म्हणाल्या की, वक्तृत्व कला साध्य करण्यासाठी आवड असली तरी आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचा सखोल अभ्यास देखील अत्यंत महत्वाचा आहे.विचार आणि शब्दांना धार निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाने शब्दांची मांडणी जरुरी असल्याचे त्यांनी सांगितले.  विद्यार्थी दशेत असतांना छोट्या पडद्यावरील दाखविण्यात येणाऱ्या विविध मराठी-हिंदी वाहिन्यांवरील मालिकांच्या संस्कृती बिघडविणाऱ्या व्यक्तिरेखांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडू देवू नका. दाखविण्यात येत असलेल्या गोष्टी खऱ्या नसतात त्या गोष्टींचा मनावर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून आपले आईवडील नेहमीच आपले हित बघतात त्यांच्या विचारांचे पालन करा असा महत्वपूर्ण उपदेश उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना सौ. पुष्पाताई काळे यांनी दिला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतिश वैजापूरकर म्हणाले की, वक्तृत्व ही कष्ट साध्य कला आहे. त्यामुळे सभा-समारंभात ज्या वक्त्याला भाषण करतांना कुठे थांबायचे हे ज्या वक्त्याला समजते तोच खरा वक्ता असतो. ज्यांच्याकडे अभ्यास, चिंतन नाही अशा वक्त्यांचा महापूर आला असून समाजात चांगल्या वक्त्यांची वानवा असल्याची खंत व्यक्त केली. ज्यांनी वक्तृत्व कला जोपासली व ज्यांना यामध्ये करिअर करायचे आहे त्यांनी शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या अशा स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला ज्या विषयावर बोलायचे आहे तो विषय धरूनच वक्त्यांनी बोलले पाहिजे. त्यासाठी चिंतन व अभ्यास अत्यंत गरजेचा असून चिंतन व अभ्यासातून हि कला बहरत जाते. हि कला साध्य करणाऱ्या व्यक्तीला समाजात कसा मानसन्मान मिळतो हे त्यांनी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, शिवाजीराव भोसले अशा विविध नामवंत वक्त्यांची उदाहरण देवून स्पष्ट केले.वक्त्याने भाषण करीत असतांना देहभान विसरता कामा नये, वक्क्तृत्व कला जोपासण्यासाठी नामवंत वक्त्यांची भाषणे ऐका व आपले भाषण आटोपते घ्यावे यासाठी उपस्थितांवर टाळ्या वाजविण्याची वेळ येवू देवू नका असा मौलिक सल्ला त्यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आयुष्यातील उमेदीची वर्ष रयत शिक्षण संस्थेसाठी खर्चे केली. त्यांनी केलेलं काम डोंगराएवढं होतं मात्र त्यांनी त्या कामाचा कधी गवगवा केला नाही. त्यांच्याकडे समाजासाठी झिजण्याची वृत्ती होती. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे सौ. सुशीलामाईंनी हट्ट केल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची मोठी सोय झाली असल्याचे पत्रकार वैजापूरकर यांनी याप्रसंगी सांगितले.  

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, सुरेगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. सुमनताई कोळपे,उपसरपंच सौ.सीमा कदम,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरु कोळपे, सदस्य भाऊसाहेब लुटे, सुरेगावचे माजी सरपंच सचिन कोळपे,श्रीकांत काळे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे,दैनिक सकाळचे सचिन देशमुख, विलास दवंगे,डॉ.आय.के.सय्यद,आबा आभाळे, बाळासाहेब ढोमसे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here