राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा विचार घराघरांपर्यंत पोहचायला हवा : अजित पवार

0

शिर्डी प्रतिनिधी ; “योग्य नियोजन केलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे. पक्षाचं संघटन वाढण्यासाठी तरुण आणि तरुणींना पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा काळ असला पाहिजे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपआपल्या गावात पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गावात, गल्लीत पक्षाचा कार्यकर्ता आणि आपल्या पक्षाचा झेंडा किंवा बोर्ड लागला पाहिजे. प्रत्येक घराघरांपर्यंत आपला पक्षाचा विचार पोहचायला हवा”, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.

“पक्षाच्या पुढील वाटचालीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत शिबीर आयोजित करण्यात आलं. खरं तर सर्व नेत्यांनी सकाळी कामाला लवकर सुरुवात केली पाहिजे. सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे. मला असं वाटायचं की मीच सकाळी फार लवकर कामाला सुरुवात करतो. आता परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी त्यांचे अनुभव सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तेव्हा ते म्हणाले मी फक्त साडेतीन तास झोपतो, पहाटे साडेतीन वाजता उठतो. त्यानंतर दररोज योगा करतो, असं त्यांनी सांगितलं”, असं अजित पवार म्हणाले.

“मला कार्यकर्त्यांना एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने जे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत किंवा पक्षाच्या पदासाठी उत्सुक आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्तित केली पाहिजे. उमेदवारांनी प्रत्येक विभागानुसार एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे. आता यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागानुसार होईल. महापालिकेच्या निवडणुकीत चारचा प्रभाग राहणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काहींनी चारचा प्रभाग करा, काहींनी दोनचा प्रभाग करा अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आणि चारचा प्रभाग करण्यात आला”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here