देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा परिसरात दि. १२ मार्च रोजी सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेतली. सुदैवाने झेप हुकली. त्यामुळे तो तरुण शेतकरी बालंबाल बचावला.
अमोल जनार्दन गाढे हे सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात गिन्नी गवत काढण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अमोल गाढे यांच्यावर झेप घेतली. त्यावेळी अमोल गाढे हे बाजूला सरकल्याने बिबट्याची झेप हुकली. आणि तो गिन्नी गवतात पडला. नंतर बिबट्या तेथून पळून गेला.
घटनेची माहिती समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यांनी ताबडतोब वन विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.