सातारा : दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. पण निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून, पेपर तपासणी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (HSC Result 2025) जाहीर होण्याची अपेक्षा आहे, तर दहावीचा निकाल (SSC Result 2025) त्यानंतर दहा दिवसांच्या आत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि पालक मोठ्या उत्सुकतेने या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच शिक्षण मंडळाकडून अधिकृत निकालाची तारीख जाहीर केली जाईल.
निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in वर उपलब्ध होईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागेल.
बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान झाल्या होत्या, आणि यंदा सुमारे १५ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या प्रक्रियेत शिक्षण मंडळ अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
निकाल ऑनलाइन कसा पाहाल?
1) अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ला भेट द्या.
2) एचएससी/एसएससी परीक्षा निकाल 2025 या लिंकवर क्लिक करा.
3) आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
4) निकाल मिळवा या बटणावर क्लिक करा.
5) तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह स्क्रीनवर दिसेल.
6) निकालाची प्रत डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा.
विद्यार्थ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.