पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे लाकूड कापण्याच्या कटरने अश्विनीचे तुकडे करणाऱ्या कुरुंदकरचे उर्वरित आयुष्य गजाआड जाणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान
.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे 11 एप्रिल 2016 रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याची पोलिस ठाण्यात भेट घेतली होती. या भेटीनंतर कुरुंदकरने त्यांची स्वतःच्या कारमध्ये गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्यांचे लाकूड कापण्याच्या कटरने तुकडे केले होते. हे तुकडे त्यांनी वसईच्या खाडीत फेकले होते. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी कोर्टाने या प्रकरणी आपला निकाल देत कुरुंदकरला जन्मठेप व 20 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
कुंदन भंडारी, पार्डीकरला प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा
सत्र न्यायालयाने या प्रकरणी कुंदन भंडारी व महेश पार्डीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली. पण या दोन्ही आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्याने कोर्टाने त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश लवकरच काढले जाणार आहेत. अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी आरोपींकडून नुकसान भरपाई घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तसे आदेश काढण्यात आले नाही. पण कोर्टाने सरकारला त्यांच्या पगाराची भरपाई देण्याचे आदेश दिलेत. विशेषतः या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांच्यावर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत.
आता पाहू काय आहे संपूर्ण प्रकरण?
अश्विनी बिद्रे-गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. पण त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबाने केला होता. तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्नाआधीपासूनच म्हणजे 2000 सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षातच अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना पोलीस उप-निरीक्षक पद मिळाले.
पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यादरम्यान त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला आल्या. अभय कुरुंदकर तिथेही अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार यायचा. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजले होते. पण त्यानंतर काही दिवसांनी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता झाल्या आणि त्यांचा खून झाल्याचे अखेर उघड झाले.
अभय कुरुंदकरचा बालमित्र असलेल्या महेश फळशीकरने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती. धक्कादायक म्हणजे अश्विनी यांची हत्या करुन, लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले होते.
लॅपटॉपमधून मिळाली महत्त्वपूर्ण माहिती
अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंताग्रस्त होते. त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे यांची जिथे पोस्टिंग होती, त्या कळंबोली पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यांना तिथे काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या, त्या फ्लॅटचं कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणी केली होती.
या तपासणीतूनच अश्विनी बिद्रे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधाबाबत आणि या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर आली होती. यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून कळंबोली पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवण्यात आली होती. या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मात्र, राजकीय संपर्कातून बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. तरीही हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल आणि मुंबईत फेऱ्या मारल्या. इतकेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन दादही मागितली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयानेही नाराजी नोंदवली होती. अभय कुरुंदकरने पदाचा गैरवापर करून गुन्हा दडवण्याचा प्रयत्न केला. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यानंतर 1 जानेवारी 2017 ला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वर्षभराने आरोपीला अटक झाली होती.
तपासात समोर आलेले पुरावे
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे त्यांची हत्या होण्याच्या काही तास आधी या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाणे शहरात भेटल्या होत्या.
संध्याकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एकत्र चहा घेतला होता.
त्यानंतर एकाच कारने दोघे मीरा रोडला कुरुंदकरच्या घरी गेले होते, असे बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांकडे असलेल्या MTNL च्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले.
अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 च्या रात्री झाली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती, हे या सर्वांच्या MTNL मोबाईल सिम लोकेशनवरुन उघड झाले.
तसेच इतर आरोपींचे लोकेशनदेखील याच परिसरामध्ये ट्रेस झाले होते. महत्त्वाचं म्हणजे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतरही त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकरने एक शक्कल लढवली.
कुरुंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरुन चॅटिंग सुरू ठेवलं. याच चॅटिंगमधून अभय कुरुंदकरचा सहभाग समोर आला. अश्विनी यांच्या मोबाईलवरुन ‘हाऊ आर यू’ असा प्रश्न विचारण्यासाठी ‘यू’ लिहिताना अभय कुरुंदकरने ‘वाय’ (Y) हे अक्षर वापरले. हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. अश्विनी ‘यू’ संबोधण्यासाठी कायम ‘U’ हे अक्षर लिहित असत. मात्र अचानक चॅटिंगमध्ये आलेलं ‘Y’ हे अक्षर पोलिसांनी हेरले. अभय कुरुंदकर अशाप्रकारे ‘यू’ साठी ‘वाय’ (Y) हे अक्षर वापरत असे. अभय कुरुंदकरचे नातेवाईक, मित्र अशा चार-पाच जणांकडून पोलिसांनी या गोष्टीची खात्री करुन घेतली.
‘यू’ म्हणण्यासाठी अभय कायम ‘Y’ वापरत असल्याचा दुजोरा पोलिसांना मिळाला, तर अश्विनी कधीच ‘यू’ म्हणण्यासाठी ‘Y’ वापरत नसल्याचंही तिच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांकडून स्पष्ट झाले. अश्विनी यांच्या मोबाईलवरुन मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण (अश्विनी) उपचार घेण्यासाठी पाच ते सहा महिने उत्तरांचल किंवा हिमाचल प्रदेशला जाणार असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. पोलिसांकडे तांत्रिक पुरावे होतेच, मात्र अश्विनी बेपत्ता झाल्या, तेव्हाही अभय त्यांच्यासोबत होता. त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी त्यांच्याच मोबाईलवरुन अभय चॅटिंग करत राहिला हे देखील चौकशीतून निष्पन्न झाले.
तसेच याप्रकरणी पोलिस तपासात अभय कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारुन हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश पळणीकरने पोलिसांना दिली होती.
सायबर एक्सपर्ट रोशन बंगेरा यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मोबाइलवरून आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या मोबाइलवरून आणि फेसबुक, व्हॉट्सॲप, लॅपटॉप, सर्व सोशल ॲपमधून महत्त्वाचा डेटा रिकव्हर केला होता. रिकव्हर केलेला डेटा हा पुराव्याच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर या प्रकरणत मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार सापडलेलं नसल्यामुळे तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरले. त्यासाठी गुगल, अंडर वॉटर स्कॅनिंग, ओशनोग्राफी विभागाची मदत, सॅटेलाईट इमेज यासारख्या तांत्रिक गोष्टींची मदत घेण्यात आली.