राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा महायुतीसोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तसेच शरद पवारांचे नाव न घेता त्यांना तुम्हाला शिवसेना चालते, पण भाजप का नाही? असा खडा सवालही केला आ
.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सतीश पाटील, गुलाबराव देवकर, कैलास पाटील यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी महायुती सरकारसोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच या प्रकरणी शरद पवारांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना आवडते, भाजप का नाही?
अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर सर्व आमदारांनी आपल्या वरिष्ठांना आपण सत्तेत सहभागी होऊया असे सांगितले होते. मी सत्तेसाठी हपापलेला माणूस नाही. मी सर्वात जास्त सत्ता उपभोगली आहे. त्यानंतर आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एनडीएसोबत जाऊन आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेतला नाही. कारण, 2019 मध्ये आपण शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तु्म्हाला शिवसेनेसोबत जायला आवडते, मग भाजप का चालत नाही? या प्रकरणी कार्यकर्त्यांना सोयीस्करपणे सांगितले जाते.
विकासासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निर्मिती मुळातच संघर्षातून झाली आहे. सध्या खूप बदल होत आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. राज्यात लाखो कोटींची कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत. फ्लायओव्हर, ब्रिज बांधले जात आहेत. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात आपल्याला अनेक कामे करायची आहेत. पाडळसे धरणाचे काम सुरू आहे. ही मोठी कामे केवळ राज्य सरकारच्या पैशांतून होत नाहीत. त्यासाठी केंद्र तसेच वर्ल्ड बँकेचा पैसाही लागतो. जायका 1 टक्का व्याजाने पैसा देते. ते केंद्र सरकारच्या परवानगीने पैसे देते. आता तुमच्या सोबत केंद्र सरकारला असायला हवे ना? म्हणून आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीत प्रत्येकाला संधी मिळणार
अजित पवारांनी यावेळी पक्षात येणाऱ्या नेत्यांना कुणाशीही भेदभाव न करण्याचीही ग्वाही दिली. तुम्ही वेगळ्या विचाराचे नाही. आपली विचारधारा एकच आहे. कधी कुणाला लवकर संधी मिळते, तर कुणाला उशिरा. पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, मी कुणाशाही भेदभाव करणार नाही. ज्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असेल, त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या पक्षात प्रत्येकाला संधी मिळेल. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे ते म्हणाले.