[ad_1]
खान्देश व मराठवाड्याला जोडणाऱ्या घाटनांद्रा ते शेलगाव रस्त्यावरील पुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. सा. बां. विभाग अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन कामाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. ७ जूनपूर्वीच पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
.
घाटनांद्रा येथून छत्रपती संभाजीनगर, शेलगाव, नाचनवेल, बाबरा, फुलंब्री या गावांना जाण्यासाठी हा मधला व जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्याने प्रवास केल्यास जवळपास २५ ते ३० किलोमीटरचे अंतर कमी होते. त्यामुळे सध्या घाटनांद्रा, तिडका, पाचोरा, बनोटी येथील वाहनधारक छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सिल्लोडमार्गे न जाता याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या नदीवर असलेल्या नळकांडी पुलाची दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पूर येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली होती.
आमदार अब्दुल सत्तार यांनी या पुलाच्या कामाकडे लक्ष देऊन अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. प्रत्यक्ष कामास सुरुवात करून पाच महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे सध्या कामगार दिवस-रात्र या पुलाचे काम करत आहेत. सात जूनपूर्वी या पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे सा. बां. विभागाचे अधिकारी, सा. अभियंता विजय सोनवणे, कनिष्ठ अभियंता करण चाटे, प्रवीण खरात, अमोल खरात, ललित खरात यांनी सांगितले.
[ad_2]