[ad_1]
हिंगोली जिल्ह्यात आगामी काळातील पाणी टंचाई लक्षात घेता केवळ निधी नसल्याचे कारण सांगून जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची कामे थांबवू नका अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी ता. २२ यंत्रणेच्या बैठकीत दिल्या आहेत.
.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल खिराडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल सोळुंके, कंत्राटदार निश्चल यंबल, माधव कोरडे यांच्यासह अधिकारी, कंत्राटदारांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेतला. ७५ टक्के पेक्षा अधिक कामे झालेल्या सुमारे १५० कामे का पूर्ण झाली नाहीत असा सवाल त्यांनी केला. यावेळी कंत्राटदारांनी तसेच अधिकाऱ्यांनी निधी नसल्यामुळे कामे करणे कठीण असल्याचे सांगितले. मात्र बिड कपॅसिटी बघूनच कामे देण्यात आलेली असल्यामुळे निधीचे कारण पुढे करून कामे थांबवू नका, सदर कामे तातडीने पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात ज्या ठिकाणी जलकुंभ उभारणीबाबत जागेचा प्रश्न आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट देऊन जागेचा प्रश्न सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या शिवाय ज्या ठिकाणी वीज जोडणी देण्यात आली नाही त्या ठिकाणी वीज कंपनीने तातडीने वीज जोडणी देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. केवळ नळ योजना अपूर्ण असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नाही अशी स्थिती निर्माण होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये किती गावे निवडण्यात आली याची माहिती घेऊन ज्या कामांना मंजुरी देण्यात आली आहेत सदर कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी विभागाकडून पाणलोटाची कामे ज्या भागात घेण्यात आली त्या ठिकाणी पुढील काळात वृक्षलागवडीचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
[ad_2]