Rishabh Pant Video: इंडियन प्रिमिअर लीगच्या 54 व्या सामन्यात पंजाबच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघावर 37 धावांनी मात केली. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला येथील मैदानात रंगलेल्या सामन्यामध्ये लखनऊच्या संघासमोर 237 धावांचं आवाहन होतं. मात्र आयपीएल 2025 च्या स्पर्धेमध्ये लखनऊच्या संघाला त्यांचा सहावा विजय मिळवता आला नाही. या सामन्यामध्ये कर्णधार ऋषभ पंत अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला.
पंतच्या हातून बॅट सुटली
सामन्यातील आठव्या ओव्हरमध्ये अझमतुल्ला ओमराझी आयुष बदोनी व ऋषभ पंत फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत होता. मोठा फटका मारण्याच्या नादात पंत पुढे चालून आला. त्याने चेंडू हवेत टोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतच्या हातून बॅट सुटली आणि ती स्वेअर लेगच्या दिशेने गेली. हातून बॅट सुटण्याआधी बॅटला लागलेला चेंडू उडून स्वीपर कव्हरमध्ये उभ्या असलेल्या शशांक सिंहच्या दिशेने गेला. एकाच वेळी बॅट आणि बॉल दोन्ही गोष्टी हवेत उडल्याने काही खेळाडू गोंधळले. मात्र शशांकने त्याच्या दिशेने आलेला चेंडू अचूक झेलला आणि पंत बाद झाला.
विश्वासच बसत नव्हता
आपल्याकडून झालेली चूक आणि बॅट हवेत उडलेली असतानाही आपण झेलबाद झालो आहोत यावर पंतचा विश्वास बसत नव्हता. झेल पकडला गेल्याचं लक्षात आल्यानंतर पंत हतबलपणे आकाशाकडे पाहत होता. पंत बाद झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
Wait… what just happened?
Bat in the air, ball in the fielder’s hands… Rishabh Pant’s dismissal had it all
Updates https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG pic.twitter.com/Q74gb4Lpu4
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
सामन्यात काय घडलं?
पहिल्या डावात पंजबाचा सलामीवीर प्रभसीमरन सिंगने 48 चेंडूंमध्ये 91 धावांची दमदार खेळी केली. प्रभसीमरनने सहा चौकार आणि सात षटकार लगावले. श्रेयस अय्यरनेही 25 चेंडूमध्ये 45 धावा केल्या. जॉश इंग्लीशने 14 बॉलमध्ये 30, निहाल वाधेराने 9 बॉलमध्ये 16 आणि शशांक सिंहने 15 बॉलमध्ये 33 धावा केल्या. मार्कस स्टॉनिसनेही 5 बॉलमध्ये 15 धावांची खेळी करत संघाला 236 धावांपर्यंत पोहचवलं. धावांचा पाठलाग करताना लखनऊकडून आयुष बदोनी आणि अब्दुल समाद हे दोघे वगळता कोणालाही वैयक्तिक स्तरावर 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. मिचेल मार्श, निकोलस पुरन यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
पंजाब दुसऱ्या स्थानी
2014 नंतर पहिल्यांदाच पंजाबच्या संघाने 15 पॉइण्ट्स मिळवले आहेत. पंजाबच्या संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पहिल्या स्थानी असून मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.