.
महापालिका पाणीपुरवठा योजनेच्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढणे (क्लॅरीफायर) तसेच प्रकल्पाच्या वीजपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम रविवारी रात्री ११ वाजता पूर्ण झाले. त्यामुळे शहराला ६५ एमएलडी प्लांटवरून होणारा पाणीपुरवठा मध्यरात्री बारानंतर सुरू होईल. परंतु ५० टक्केच नागरिकांना सोमवारी दुपारनंतर पाणीपुरवठा करणे शक्य होईल. उर्वरित शहराचा पाणीपुरवठा मंगळवारपासून पूर्ववत होईल, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिली.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ६५ एमएलडी प्लांटवरून मलकापूर, खडकी, उमरी, गुडधी, अकोट फैल परिसरातील वाढीव वस्ती भागाला होणारा पाणीपुरवठा २ ते ४ मे असा तीन दिवस पूर्णत: बंद होता. त्यामुळे शहराला विशेषत: वाढीव वस्ती भागाला गेले दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परिणामी शहरात खासगी टँकरला मागणी वाढली आहे. त्यासाठी वेटिंगवर राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे श्रद्धा नगर, केशवनगर, आदर्श कॉलनी, नेहरू पार्क, तोष्णीवाल ले-आउट, हरिहरपेठ, लोकमान्य नगर, जोगळेकर प्लॉट, गंगानगर, मराठी स्कूल, महाजनी प्लॉट, हिंदी स्कूल, रेल्वे स्टेशन, अकोट फाईल, उमरी, गुडधी, मलकापूर, खडकी या भागातील जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद शुक्रवारपासून रविवारपर्यंत बंद होता.
मंगळवारपासून होणार पूर्ववत पुरवठा रविवारी रात्री ११ वाजता देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून अकोला शहरापर्यंत पाणी पोहोचण्यास साडेतीन तासांचा अवधी लागतो. याचा अर्थ सोमवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास पाणी शहरात ६५ एमएलडी प्लांटवर पोहोचेल. त्यानंतर विविध भागातील जलकुंभ भरले जातील. त्यानंतर म्हणजे दुपारनंतर निम्म्या शहराला पाणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्लांटवरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांना आता ६ मेपासून ठराविक वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे.