पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील सलाहकार जेसन मिलर यांची नेमणूक केली, असे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांन
.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनता पाकिस्तानच्या विरोधात कारवाईची मागणी करत आहे. हल्ल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला आहे. मात्र, सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले, अशी परिस्थिती दिसत आहे. सामान्य जीवन सुरू असल्याची परिस्थिती भासवली जात असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रात एक बातमी आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र जेसन मिलर नावाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवर जी कारवाई करायची आहे, ती करण्यासाठी या सल्लागाराकडून परवानगी मागितली जाणार का? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारकडे पारदर्शकतेचा अभाव
देशाकडे स्वतःचे परराष्ट्र मंत्रालय असताना भारताला परकीय सल्लागाराची गरज भासते हे चिंताजनक आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. भारत सरकारने या प्रकरणात पारदर्शकता दाखवावी आणि नेमणुकीचे कारण व उद्दिष्ट देशातील नागरिकांसमोर ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
जेसन मिलरच्या नियुक्तीचा सरकारने खुलासा करावा
या प्रकरणात आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. जेसन मिलर यांची नेमणूक केंद्र सरकारने केली का? जर हो, तर त्यामागचे कारण काय आहे? असा थेट सवाल करत त्यांनी या बाबतीत केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली. भारत सरकार आता जेसन मिलर यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही का? असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर एखाद्या विदेशी व्यक्तीला भारतात धोरणात्मक जबाबदारी दिली जात असेल, तर त्याबाबत संपूर्ण पारदर्शकता व उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी
जेसन मिलर हे यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार होते. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तीची भारतासारख्या देशात नियुक्ती होणे, हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत भारत स्वतः सक्षम असून, विदेशी व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता का भासली, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली. या संपूर्ण प्रकरणावर तातडीने उत्तर देत केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणते पावले उचलली आहेत, हे सांगणे गरजेचे असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. देशाच्या धोरणांत कोणताही परकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.