[ad_1]
बांधकाम कामगारांना कायद्याने देय असलेले विविध लाभ गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील शेकडो बांधकाम कामगारांनी येथील कॅम्प स्थित सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक देत या कार्यालयासमोर निदर्शने केली. अर्धा दिवस
.
आयटकच्या नेतृत्वातील राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. बांधकाम कामगार फेडरेशनचे प्रदेश सरचिटणीस संजय मंडवधरे, संघटनेचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर मेश्राम, कार्याध्यक्ष प्रज्ञा बनसोड व कोषाध्यक्ष जयेंद्र भोगे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना घरकुल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी, मुलीच्या विवाहासाठी अनुदान, आजारातून बरे होण्यासाठी औषधोपचार आदी सुविधा पुरवल्या जातात. मात्र यंत्रणेतील उणिवांमुळे या सुविधा बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे कायदेशीर तरतूद असतानाही बांधकाम कामगारांची दैनंदिन होरपळ ही जशीच्या तशीच आहे. या बाबीकडे लक्ष वेधत आंदोलनकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
दरम्यान मंडळाच्या कामकाजात सुधारणा व्हावी व मंडळाला संघटनेकडून सहकार्य मिळावे, म्हणून काही पर्यायदेखील पुढे करण्यात आले. आयटकच्या नेतृत्वातील ही संघटना मंडळाच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी मनुष्यबळासह योग्य ती मदत करण्याचीही या संघटनेची तयारी आहे. नोंदणी, नूतनीकरण, वेगवेगळ्या योजनांचे अर्ज दाखल करण्यापासून ते लाभ पोहोचवण्याच्या कामातही मदत देण्यास ही संघटना तयार आहे. या संदर्भातील सविस्तर तपशील आंदोलनाअंती दिलेल्या निवेदनात नमूद केले आहेत. आंदोलनस्थळी झालेल्या सभेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मुद्यांची मांडणी केली. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील जिल्हा कामगार अधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह कामगार आयुक्त, या खात्याचे सचिव तसेच इतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहे. आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी वैशाली निस्वादे, सुरेश शंभरकर, मालाताई वानखडे, प्रतिभा मेश्राम, संतोष राऊत, संदीप उके, शेखर बद्रे, किशोर काळे आदी सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वाटप नियमित पद्धतीने करा, मुलींच्या विवाहासाठी दिली जाणारी मदत एक ऐवजी दोन मुलींसाठी द्या, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी काही विशिष्ट अभ्यासक्रमांची अट न ठेवता ती सरसकट विषयांसाठी लागू करा, नूतनीकरणासाठी आवश्यक असलेले ग्रामसेवकाचे पत्र सहजतेने प्राप्त होईल यासाठी त्यांना तसे निर्देश द्या, तालुकास्तरावर उघडण्यात आलेल्या सुविधा केंद्रात पिण्याचे पाणी, पार्किंग, प्रसाधन गृह आदी सुविधा उपलब्ध करून द्या.
बांधकाम कामगारांच्या या आहेत प्रमुख मागण्या
[ad_2]