महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  स्वच्छता मोहीम

0

IMG-20250604-WA0030 (2).jpg

७० किलोहून अधिक कचरा गोळा.

महाबळेश्वर प्रतिनिधी , : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने आज (४ जून २०२५) ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ अंतर्गत प्रसिद्ध विल्सन पॉईंट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवली. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ आणि या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ या अनुषंगाने, महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने २२ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून ही स्वच्छता मोहीम हाती घेतली.

या मोहिमेमध्ये अंजुमन हायस्कूल आणि माखारीया हायस्कूलचे विद्यार्थी तसेच एव्हर शाईन हॉटेलचे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. हिलदारी अभियान अधिकारी श्री. राम भोसले यांनी यावेळी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहिमेचा समारोप ‘स्वच्छ भारत हरित भारत प्रतिज्ञा’ घेऊन करण्यात आला.

या विशेष स्वच्छता मोहिमेदरम्यान विल्सन पॉईंट परिसरातून एकूण ७१.६५ किलोग्रॅम कचरा गोळा करण्यात आला. यात १८.६५ किलोग्रॅम प्लास्टिकच्या बाटल्या, २६.१ किलोग्रॅम काचेच्या बाटल्या, ७.१४ किलोग्रॅम बिस्कीट आणि चिप्सची रिकामी पाकिटे, ४.३८ किलोग्रॅम पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक, ५.२७४ किलोग्रॅम कापड, ६.१३५ किलोग्रॅम कागद व पुठ्ठा  ३.९७१ किलोग्रॅम रबर इत्यादी कचऱ्याचा समावेश होता.

ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, कर व प्रशासकीय अधिकारी अमित माने, लेखापरीक्षक सचिन कदम, बांधकाम अभियंता मुरलीधर धायगुडे, आरोग्य निरीक्षक प्रमोद कुंभार, स्वच्छता मुकादम मनोज चव्हाण, स्वच्छ भारत शहर समन्वयक वैभव साळुंखे, हिलदारीचे राम भोसले व त्यांची टीम, तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here