के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात ‘सायबर गुन्हे व सुरक्षेबाबत जनजागृती’ व्याख्यान

0

  

कोपरगाव :
“सद्यस्थितीमध्ये सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत, ही गोष्ट सुदृढ समाजाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे त्याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापासून सायबर गुन्हे, त्याचे स्वरूप आणि त्याची दाहकता समजावून घेऊन यापासून दूर राहिले पाहिजे. तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.” असे प्रतिपादन अॅड्. विद्यासागर शिंदे यांनी येथे केले. के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या KJ Somaiya Senior and KB Rohmare Junior College अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व बीसीए सायन्स विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर गुन्हे व सुरक्षेबाबत जनजागृती’ या विषयावर आयोजित व्याख्यान सत्रात अॅड्. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे होते.
अॅड्. शिंदे यांनी याप्रसंगी सायबर गुन्ह्याचे स्वरूप त्याचे विविध प्रकार त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर इत्यादी सोबतच त्याच्याशी संबंधित कायदे विविध कलमे आणि त्यानुसार होणाऱ्या शिक्षा याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले तसेच श्रीरामपूर व कोपरगाव परिसरात घडलेल्या सायबर गुन्ह्यांचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. अलिकडे मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येतात आणि त्याद्वारे आर्थिक फसवणुकीचे भयंकर गुन्हे कसे घडतात, त्याविषयी जागरूकता कशी पाळावी आदी बाबींवर प्रकाश टाकला. 
व्याख्यान सत्राच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा संदीप रोहमारे म्हणाले की “सायबर गुन्हे हे तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात घडतात. महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी तरुणच आहे.  त्यामुळे त्यांनी यापासून सावधानता बाळगली पाहिजे आणि आपली ऊर्जा समाजविधायक कामाकडे वळवली पाहिजे. चांगले करिअर केले पाहिजे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एस यादव म्हणाले की “विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि माहिती तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला पाहिजे.  आपले भविष्य घडवण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच आपण व आपला देश पुढे जाईल.”
बी.सी.ए. सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा.  पुष्कर जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर प्रा. विपुल ब्राह्मणे यांनी प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.  प्रा. शुभम सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यान सत्रात बीसीए सायन्स व बीसीएस विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. शाकंभरी जोशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here