गौतम सह बँकेला ३.३९ कोटी नफा-व्हा.चेअरमन बापूराव जावळे

0

बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के

कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी गौतम सहकारी बँकेच्या इवलेशा लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत चेअरमन स्व. सुधाकर दंडवते यांनी व्हा.चेअरमन संचालक मंडळ व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी  यांच्या सहकार्याने आर्थिक वर्ष २०२३/२४ मध्ये गौतम सहकारी बँकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच शून्य टक्के नेट एनपीए राखण्यात यश मिळविले आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला ३.३९ कोटी ढोबळ नफा झाला असून त्यात मागील वर्षाच्या तुलनेत ७.१० टक्क्यांनी वाढ झालेली आहे अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे यांनी दिली.

उपाध्यक्ष जावळे यांनी सांगितले की, काही काळापूर्वी बरेच दिवस तोट्‌यात असणाऱ्या गौतम बँकेने कात टाकून मागील काही वर्षापासून नव्या जोमाने पुन्हा आघाडी घेत मोठा नफा मिळवीला आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेचा नेट एनपीए पहिल्यांदाच शून्य टक्के झालेला आहे. बँकेने २०१८ साली व कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार काही काळ थांबून मागील वर्षापासून सभासदांना लाभांश देखील देण्यास प्रारंभ केलेला आहे आणि या पुढील काळातही बँक सभासदांना दरवर्षी लाभांश देण्याचा प्रयत्न करणार आहे. चालू वर्षी गौतम सहकारी बँकेच्या निफाड तालुक्यातील खेडले झुंगे आणि येवला येथे ०२ नवीन शाखा सुरु होणार आहे. यापुढील काळात बँकेत लवकरच मोबाइल बैंकिंग प्रणाली सेवा, तसेच आज रोजी भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे ग्राहक फोन बिल, इलेक्ट्रीसिटी बिल, मोबाईल बिल भरण्याची सेवा अशा विविध सेवा ग्राहकांना देण्यात येत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण पावडे आणि प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी संस्था स्थापन करून ह्या संस्था त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करीत आहे. या आदर्श विचारातूनच गौतम बँकेची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती व शून्य टक्के नेट एनपीए अतिशय समाधानाची गोष्ट आहे. यामध्ये बँकेचे दिवंगत चेअरमन स्व. सुधाकर दंडवते, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, सभासद व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, बँकेचे ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचे योगदान असून सर्व अभिनंदनास पात्र असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here