साई पालखी सोहळ्यासाठी माता सीता फेम अभिनेत्री दीपिका राहणार उपस्थित

0

साई भक्तांचा आनंद होणार द्विगुणीत

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातून दरवर्षी रामनवमीच्या दिवशी कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रभू श्रीरामचंद्र व साई बाबांच्या नावाचा जयघोष करीत रवाना होणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी प्रसिद्ध रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चीखलिया शुक्रतीर्थ मारुती मंदिर, मोहनीराज नगर याठिकाणी सायंकाळी ५.०० वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळ्याच्या आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

         श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नावाजलेले देवस्थान असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्या व जगाच्या काना कोप-यातुन साईभक्त दर्शनासाठी शिर्डी येथे येत असतात. तसेच श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव धार्मिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे या श्रीराम नवमीच्या उत्सवाला राज्यातून व परराज्यातून साई भक्त शेकडो किलोमीटर पायी चालत साई पालखी घेवून येत असतात. मात्र कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणारी सर्वात मोठी पालखी असा या साई पालखीचा नावलौकिक आहे. हि साई पालखीची परंपरा मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहराने देखील सुरु ठेवली असून सालाबादा प्रमाणे याहीवर्षी श्रीरामनवमी सणाच्या निमित्ताने सर्वात मोठा कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी बुधवार (दि.१७) रोजी हा पालखी सोहळा शिर्डी साठी प्रस्थान करणार आहे. दरवर्षी या पालखी सोहळ्यात लहान थोर भाविकांसह महिला वर्गाची देखील मोठी उपस्थिती असते.

या पालखी सोहळ्यासाठी काही दशकापूर्वी भाविकांच्या मनावर राज्य करणाऱ्या व प्रभू श्रीरामाचे जीवन चरित्राचे दर्शन घडविणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल व माता सीता यांची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चीखलिया यांच्या भूमिकेमुळे रामायण मालिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. याच मालिकेतील माता सीता अर्थात अभिनेत्री दीपिका चीखलिया कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या पुढाकारातून कोपरगाव-शिर्डी साई पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या साई पालखी सोहळयाला माता सीता उपस्थित राहणार असल्यामुळे साई भक्तांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here