उचगाव: कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे.याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकतेच्या पवित्र्यात आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई हे आज, कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावरील कार्यक्रमासाठी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळावर आले असता शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बोंम्मई यांना निवेदन देऊन आपली भूमिका मांडली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह सांगली जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बोंम्मई यांना यावर तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच धरणाची उंची वाढवण्यास विरोध दर्शवला. अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१२ ठेवावी, अशी मागणी वारंवार केली जाते. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद एकीकडे न्यायालयात असताना अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. पाच मीटरने उंची वाढवल्यानंतर अलमट्टीची पाणी पातळी थेट शिरोळ बंधा-यापर्यंत पोहोचणार असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ञ करत आहेत. यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात जाणाऱ्या नद्यांमधले पाणी पुढे सरकणार नाही. पावसाळ्यात ही दोन्ही शहरं जलमय होऊ शकतात. तर शिरोळ तालुक्यातील साडेपाच ते सहा हजार एकर जमीन नापीक बनण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वाद आणखी तापण्याची चिन्हं आहेत.
अलमट्टी धरणाचा तिढा, कोल्हापूरला पाण्याचा वेढा
अलमट्टी धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरांना अलमट्टी धरण कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सांगलीपासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अलमट्टी धरणाचा सांगली आणि कोल्हापुरातल्या महापुराशी थेट संबंध नसल्याचा एक मतप्रवाह आहे. दरम्यान, अलमट्टीची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रातून जोरदार विरोध सुरू झाला आहे.