उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आदर्श मोठीजुई शाळेत दिवाळीपूर्वी गडकिल्ले उपक्रमाला सुरुवात झाली.शिवरायांचे वारसदार म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची जबाबदारी म्हणून आपली गडकिल्ले संवर्धन काळाची गरज आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामनात बिंबविण्यासाठी मातीचे गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा सुरू करण्यात आली होती या मातीशी आपलं घट्ट नातं आहे हे आपल्या प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. व आपल्या कृतीतून शिवरायांचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न केला.
इयत्ता 2 ते 7 वी पर्यंतच्या मुलांनी गटनिहाय सहभाग घेऊन स्वतःच्या संकल्पनेतुनच शिवरायांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. यामध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, मुरुड जंजिरा,कर्नाळा,कोंढाणा इ.किल्ले मुलांनी तयार केले होते. या किल्ल्यांचे स्पर्धा प्रदर्शनाचे उदघाटन ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुई सरपंच अश्विनी ताई भोईर यांनी केले. यावेळी पंचायत समिती उरण साधन व्यक्ती मनिषा पाटील,माजी सरपंच ललिता ताई पाटील, सदस्या तेजश्रीताई भोईर,सुरेखा ताई भोपी, शाळा व्यवस्थापण सदस्या रश्मी ताई भगत,गुलाबताई कोळी,प्रगती ताई कोळी,क्रांतीताई भोईर,सविताताई पाटील,शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर,शिक्षक दर्शन पाटील,संदीप गावंड,यतीन म्हात्रे श्रीम.ज्योती बामणकर ,काजल पाटील उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेत सहभागी सर्व किल्ल्याचे परीक्षण करून लहान गटात किल्ला सिंहगड इयत्ता चौथी व मोठ्या गटात किल्ला प्रतापगड इयत्ता पाचवी या किल्ल्यांना प्रथम क्रमांक देण्यात आले. तर विशेष प्राविण्य म्हणून किल्ला मुरुड जंजिरा इयत्ता सातवी यांना देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे भरभरून अभिनंदन व कौतुक करण्यात आले. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर यांनी मानले व प्रदर्शनाची सांगता केली.