लखनऊ : आधी शेतकरी आंदोलनासाठी प्रकाश झोतात आलेले लखीमपूर खिरी जिल्ह्यात दलित कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींची बलात्कार करून हत्या केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या मुलींवर बलात्कार झाल्याचं आणि त्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच उत्तर प्रदेशात योगी सरकार बुलडोझर बाबा म्हणून प्रसिद्ध झाले आहेत त्यात पुन्हा एकदा लाखिमपुरी खिरी प्रकरणाने कायदा सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट झाल्याने योगी सरकार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.
दलित कुटुंबातील या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी होत्या. मुलींचे वय अनुक्रमे १७ आणि १५ वर्षे होतं.
दोघींचे मृतदेह बुधवारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार आणि त्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ६१ किलोमीटर अंतरावर या मुलींच गाव आहे.गावाच्या उत्तरेला एक भलं मोठं ऊसाचं शेत आहे. या शेताजवळच त्या मुलींच घर आहे. याच शेतातील एका झाडाला मुलींचे मृतदेह लटकवण्यात आले होते.
<p>याबाबत गावकऱ्यांनी सांगितले की “साडे चार वाजल्यापासून मुलींचा शोध घेणं सुरू होतं. मुली सापडत नाहीत म्हटल्यावर गावातल्या १५ ते २० जणांनी शोधाशोध सुरू केली. त्याच उसाच्या फडात खैराच एक झाडं होतं. त्या झाडाच्या फांदीला या दोघी बहिणींचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला”
मुलींच्या आईने जी तक्रार दिली होती, त्याआधारे निघासन पोलिसांनी खून, बेकायदेशीरपणे घरात घुसणे आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.
आईने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, “दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी माझ्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने दुचाकीवर बसवलं आणि पळवून नेलं.”
आईने दिलेल्या या तक्रारीची दखल आयजी लक्ष्मी सिंह यांनी घेतली. त्या स्वतः लखीमपूर इथं आल्या आणि तपासाची सूत्र हाती घेतली, त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लखीमपूर खेरीचे एसपी संजीव सुमन म्हणाले की, “हे आरोपी शेजारच्याच लालपुर गावातले असून गावातल्याच एका मुलाने त्यांना या कुकृत्यात मदत केली होती.” मुलींच्या आईने सांगितल्याप्रमाणे, काही मुलं बाईकवरून आली आणि त्यांनी जबरदस्तीने मुलींना बाईकवर बसवून नेलं.
काही वेळातच शोधाशोध सुरू झाली. लालपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी एक ऊसाच शेत होतं. या शेतातल्या एका झाडाच्या फांदीला या दोन्ही बहिणींचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपासाची चक्र फिरली.
<p>लखीमपूर खिरी पोलिसांनी लालपूर गावातून पाच तर मुलींच्या गावातून एकाला अटक केली.
एसपी संजीव सुमन म्हणाले की, “जुनैद आणि त्याच्या इतर मित्रांबरोबर मुलींची ओळख झाली होती. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. आरोपींनी मुलींना फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला, गळा दाबून त्यांची हत्या केली आणि मृतदेह झाडाला लटकवले. आरोपींनी त्यांच्या अन्य साथीदारांनाही बोलावलं. प्राथमिक चौकशीअंती या गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपींचे कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.”
या मुलींचे दोन्ही भाऊ रातोरात दिल्लीहून गावाला यायला निघाले. सकाळी ९ वाजता ते दोघे गावात पोहोचले. त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांचं म्हणणं आहे की, “त्या दोघीही त्यांच्या मनाने गेल्या असं पोलीस सांगतायत. जर त्या मनाने गेल्या होत्या तर त्यांना मारलं का? आम्हाला काहीच समजायला मार्ग नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली .