कोपरगावच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचा सार्थ अभिमान – आ.आशुतोष काळे

0

शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सदस्य नोंदणीसाठी प्रतिज्ञापत्र भरून देण्याचे आव्हान केले होते. त्या आवाहनाला राज्यासह कोपरगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देवून लाखो शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी प्रतिज्ञापत्र भरून दिले आहेत. मात्र हे प्रतिज्ञापत्र हे बोगस असल्याच्या नावाखाली सदरच्या शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्रांची मुंबई क्राईम ब्रँचकडून मागील तीन दिवस चौकशी करण्यात आली अनेक शिवसैनिकांचे जबाब देखील घेण्यात आले परंतु  या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नसून कोपरगावच्या शिवसैनिकांनी दिलेली प्रतिज्ञापत्र बोगस किंवा खोटे नसून सत्य असल्याचे समोर आले आहे.

कोळपेवाडी वार्ताहर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कोपरगावच्या शिवसैनिकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या चौकशीत चुकीचे काहीही निष्पन्न झाले नाही. यातून कोपरगावचे शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत असून महाविकास आघाडीचा घटक या नात्याने पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कोपरगावच्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे शिवसेनेला अनेकांनी सोडून जावून देखील खरा शिवसैनिक हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचे स्पष्ट होत आहे. आजही खऱ्या शिवसैनिकांची शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे व त्यांच्या विचाराने आजही प्रत्येक शिवसैनिक शिवसेनेशी कौटुंबिक नात्यात एकसंघ जोडला असल्याचे दिसून आले. कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक आजही शिवसेनेवर व हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करतो हवे सिद्ध होत असून सर्व स्वाभिमानी शिवसैनिक आजही त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याचा मनस्वी अभिमान वाटत आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे अडचणीच्या काळात शिवसेनेच्या सोबत राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साथ देत आहे त्याप्रमाणे कोपरगावच्या शिवसेनेसोबत उभे राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटले आहे.